‘महाराष्ट्र केसरी’ गदेची कोल्हापूरला १८ वर्षांपासून प्रतीक्षाच

सुधाकर काशीद
सोमवार, 24 डिसेंबर 2018

कोल्हापूर - यंदाचा महाराष्ट्र केसरी झाला आहे. महाराष्ट्र केसरीचा थरार आणि लौकिकही कायम आहे; पण या महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापूरला कधी येणार? असे इथले कुस्तीशौकीन उघड विचारत आहेत. ८० तालमी व एक शासकीय कुस्ती केंद्र असूनही गेल्या १८ वर्षांत महाराष्ट्र केसरीच्या गदेवर कोल्हापूरच्या पैलवानाचे नाव कोरलेले नाही, अशी परिस्थिती आहे. कोल्हापूरच्या तालमीत असलेली रग गेली तर कोठे? हा प्रश्‍न कोणी विचारला तर त्याला काय उत्तर द्यायचे, हा इथल्या दिग्गजांपुढचा प्रश्‍न आहे. 

कोल्हापूर - यंदाचा महाराष्ट्र केसरी झाला आहे. महाराष्ट्र केसरीचा थरार आणि लौकिकही कायम आहे; पण या महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापूरला कधी येणार? असे इथले कुस्तीशौकीन उघड विचारत आहेत. ८० तालमी व एक शासकीय कुस्ती केंद्र असूनही गेल्या १८ वर्षांत महाराष्ट्र केसरीच्या गदेवर कोल्हापूरच्या पैलवानाचे नाव कोरलेले नाही, अशी परिस्थिती आहे. कोल्हापूरच्या तालमीत असलेली रग गेली तर कोठे? हा प्रश्‍न कोणी विचारला तर त्याला काय उत्तर द्यायचे, हा इथल्या दिग्गजांपुढचा प्रश्‍न आहे. 

कोल्हापूरला कुस्तीचा मोठा इतिहास आहे. अतिशोयक्ती नाही; पण पेठापेठांत तालमी आहेत. किंबहुना, तालमीच्या नावावर पेठांची ओळख आजही जिवंत आहे. परंतु, प्रत्यक्षात शाहूपुरी, गंगावेश, मोतीबाग, न्यू मोतीबाग या तालमीतच बऱ्यापैकी कुस्तीचा सराव सुरू आहे. इतर तालमींचे नूतनीकरण झाले आहे; पण नूतनीकरण करताना लाल मातीचे आखाडे बंद झाले आहेत. तालमीत आधुनिक व्यायामशाळा आहेत. फुटबॉल आहे.

मोहरम, टेंबलाईची यात्रा आहे. प्रत्यक्षात मात्र कुस्ती बंद आहे. नवीन पैलवान येत नाहीत म्हणून कुस्ती बंद आणि कुस्ती बंद म्हणून पैलवान येणे बंद, अशी विचित्र परिस्थिती आहे. काही तालमीत बाहेरचे मल्ल येऊन सराव करत आहेत. परंतु, ते नाव कमवायच्या ऐवजी शरीरयष्टी कमवायच्या उद्देशाने येत आहेत. ज्या तालमीत कसून सराव आहे, त्या तालमीतील महाराष्ट्र केसरीसाठी पात्र मल्लांचा वस्ताद, प्रशिक्षकांकडून कसून सराव आवश्‍यक आहे. मात्र, तसे होत नाही हे वास्तव आहे. 

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी कोल्हापूरचा संघ फक्त जातो आहे; पण महाराष्ट्र केसरीची गदा न घेताच परततो आहे. त्यामुळे महाराष्ट्र केसरी पद कोल्हापूरला १८ वर्षे मिळालेले नाही, हे वास्तव आहे. आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी कोण पुढाकार घेणार आहे की नाही, हाच या क्षणीचा मोठा प्रश्‍न आहे. 

कोल्हापुरातल्या पैलवानांनी आपण मागे कोठे पडतो, यावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे आणि कुस्ती केवळ पैलवानांच्या ताकदीवर नव्हे, तर इतर घटकांनीही त्या पैलवानाला बाहेरून बळ देण्याची गरज असते. आता पैलवानांना पूर्वीसारखी मदत मिळत नाही. हे खरे असले तरीही पैलवानांनी जिद्द दाखवलीच पाहिजे; पण काही वर्षांत तसे झालेले नाही. 
- हिंदकेसरी दीनानाथ सिंह 

महाराष्ट्र केसरी व्हायचंच या तयारीने जिल्ह्यातील मल्ल सरावावर लक्ष केंद्रित करत नाहीत. महाराष्ट्र केसरीसाठी पात्र ठरू शकणाऱ्या मल्लांनी इतर स्पर्धा, जत्रा, यात्रांतील कुस्तींपेक्षा केवळ महाराष्ट्र केसरीची गदा एवढेच लक्ष ठेवावे. 
- चंद्रहार पाटील, महाराष्ट्र केसरी

मी माझ्या राष्ट्रकुल कुस्ती संकुलातून काही ठरावीक मल्लांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांना सराव देत आहे. मल्लांनी नावासाठी कुस्ती करायची की पैशासाठी हादेखील महत्त्वाचा प्रश्‍न आहे. पैसा जरूर पाहिजे; पण त्या जोडीला मोठ्या मानाच्या कुस्तीतही आपले कौशल्य दाखवले पाहिजे. 
- राम सारंग, राष्ट्रकुल विजेते आणि कुस्ती प्रशिक्षक

महाराष्ट्र केसरी कोल्हापूरला मिळत नाही यामागे आपली मेहनत कमी पडते, हेच मुख्य कारण आहे. पैलवान मेहनत कमी करतात हे उघड सत्य आहे. मेहनत कमी पडली तर त्याचा परिणाम नक्कीच कुस्तीवर होतो. कोल्हापुरात नेमके हेच घडते आहे. 
- दादू चौगुले, महान भारत केसरी

Web Title: Maharashtra Kesari Wrestling competition special