जालन्यात रंगणार कुस्तीची दंगल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 डिसेंबर 2018

जालना - महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने जिल्हा राष्ट्रीय तालीम संघातर्फे ता. 19 ते 23 डिंसेबरदरम्यान वरिष्ठ राज्य अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार आहे. 

जालना - महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने जिल्हा राष्ट्रीय तालीम संघातर्फे ता. 19 ते 23 डिंसेबरदरम्यान वरिष्ठ राज्य अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार आहे. 

आझाद मैदानावर होणाऱ्या स्पर्धेचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. 20) सायंकाळी पाच वाजता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या वेळी संयोजक राज्यमंत्री अर्जुन खोतकर, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, पालकमंत्री बबनराव लोणीकर आदींची उपस्थिती राहील. शिवाय स्पर्धेत अभिनेता अरबाज खान, क्रिकेटपटू विजय झोल यांचे आकर्षण राहणार आहे. बुधवारी (ता. 19) सहभागी मल्लांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रत्येकी दोन माती व गादीचे आखाडे तयार करण्यात आले आहेत. स्पर्धकांच्या राहण्याच्या व निवासाची सोयही करण्यात आली आहे. ही स्पर्धा 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 किलो गट व 86 ते 125 किलो गादी गटामध्ये होईल. माती व गादी गटात प्रत्येकी 10 खेळाडू जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करतील. महाराष्ट्र केसरी किताब जिंकणाऱ्या मल्लास दोन लाख रोख व चांदीची गदा बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेचा समारोप माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण सिंह यांच्या उपस्थितीत 23 डिंसेबर रोजी होणार आहे. 

जालन्यांत कुस्तीगीर परिषदेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा मुक्काम राहणार असून कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते पाटील, बाळासाहेब लांडगे, गणेश कोळे, बंकट यादव आदी दाखल झाले आहेत. 

लढती होणार चुरशीच्या 
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अनेक नामवंत मल्ल सहभागी होणार असल्याने सामने चुरशीचे होतील, असे मराठवाडा विभागाचे पदाधिकारी डॉ. दयानंद भक्त यांनी सांगितले. स्पर्धेत यापूर्वीचा महाराष्ट्र केसरी अभिजित कटके, किरण भगत, माऊली जमधडे, सागर बराजदार, अक्षय शिंदे, हर्षद यदगीर, शिवराज सराक्षे आदींचा सहभाग राहणार आहे. 

Web Title: Maharashtra Kesari Wrestling Tournament in Jalna