साताऱ्याविरुद्ध पुणेच ठरले ‘उस्ताद’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

पुणे - महाराष्ट्र कुस्ती दंगल स्पर्धेत पहिल्या लढतीपासून वर्चस्व राखणाऱ्या सातारा यशवंत संघाला विजेतेपदाच्या लढतीत मात्र यशवंत होण्यात अपयश आले. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात रविवारी झालेल्या अंतिम लढतीत पुणेरी उस्ताद संघ खऱ्या अर्थाने ‘उस्ताद’ ठरला. अंतिम फेरीत त्यांनी सातारा संघाचे आव्हान ४-२ असे परतवून लावले.

महिलांच्या ५५ किलो वजनी गटाच्या लढतीत अंशू मलिकने पुण्याच्या विश्रांती पाटीलला दीड मिनिटात चीतपट करून साताऱ्यासाठी यशस्वी सुरवात केली. मात्र, त्यानंतर यश त्यांच्यापासून दुरावत गेले. ७४ किलो वजनी गटात विनोद कुमारने अक्षय चोरगेवर मात करून पुण्याला बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर राहुल आवारेने ६५ किलो वजनी गटात साताऱ्याच्या सूरज कोकाटेचे आव्हान सहज परतावून लावले. 

संग्राम पाटीलने ८६ किलो वजनी गटात अखेरच्या क्षणाला कौतुक डाफळेचा १०-९ असा पराभव करून पुण्याची आघाडी भक्कम केली. त्यानंतर लक्षवेधी ठरलेल्या ८६ किलोपेक्षा अधिक वजनी गटात गणेश जगतापने साताऱ्याच्या आदर्शचे आव्हान शिताफीने परतावून लावत पुण्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.अखेरच्या औपचारिक लढतीत दुखापतीनंतरही साताऱ्याच्या उत्कर्ष काळेने पुण्याच्या पंकज पवारवर ९-० अशा आघाडीने मात केली. 

विजयी पुणे संघाला ५०, उपविजयी सातारा संघास ३० आणि तिसऱ्या क्रमांकावरील विदर्भास २० लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

Web Title: Maharashtra Kusti Dangal Competition Wrestling