चंद्रहार पाटीलच्या सहभागाचे आकर्षण

चंद्रहार पाटीलच्या सहभागाचे आकर्षण

सुवर्णमहोत्सवी किताबानंतर पुन्हा पुण्याजवळील कुस्तीगिरांच्या भूगाव गावी होणारी ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेतही कुस्तीची परंपरा पहाण्यास मिळणार आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलचा विक्रमी सहभाग हे ५१ व्या किताबी स्पर्धेचे वैशिष्ट्य असून त्याच्यासह गतउपविजेता अभिजित कटके, किरण भगत, माउली जमदाडे, सागर बिराजदार यांना संभाव्य विजेतेपदाची पसंती मिळत आहे. 

नागपूरमध्ये विजय चौधरीने चितपट कुस्ती करीत मैदान गाजवले होते. त्यानंतर पुण्यातील ट्रिपल किताबच्या झुंजीत उंचपुऱ्या अभिजितने त्याला झुंजवले होते. लढत विजयने तर मने अभिजितने जिंकली होती. तेव्हापासूनच अभिजित हाच २०१७ च्या महाराष्ट्र केसरी गदेचा डार्कहार्स समजला जात आहे. त्याच्या वर्षभरातील कामगिरीवर नजर टाकता आणि सराव पहाता तोच पुणे गाजविणार असे स्पष्ट होते. अभिजित हा मॅटवरील राष्ट्रीय मल्ल. पुण्यातील एप्रिलअखेरीस झालेल्या हिंदकेसरीच्या मातीवरील आखाड्यातही त्याने कसब दाखवून तो उपहिंदकेसरी मानकरी ठरला. मॅटवरील कुस्तीत भारदांज डावावर गुणांवर कुस्ती जिंकण्याच्या अभिजितच्या कौशल्याला तोड नाही. 

भूगाव अधिवेशनात लक्षवेधी ठरणार आहे तो सांगलीचा चंद्रहार पाटील. राष्ट्रकुल कुस्ती संकुलाचे संस्थापक राम सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कसून सराव करत या वर्षी पुन्हा महाराष्ट्र केसरीसाठी शड्डू ठोकले आहेत. गेली बारा वर्ष तो केसरी किताबाच्या रणभूमीत दिसत आहे. वाशी येथील २००४ मधील स्पर्धेत तो प्रथम राज्यातील सर्वश्रेष्ठ किताबाच्या लढ्यात उतरला. २००५ इंदापूर अधिवेशनात  त्याला पराभवाची चव चाखावी लागली. बारामती स्पर्धेच्या वेळी तो दुखापतगस्त होता. पुढच्याच औरंगाबाद स्पर्धेत मोतीबाग तालमीच्या या पठ्याने चितपट खेळ करीत रणभूमी गाजविली. पाठोपाठ जन्मभूमी सांगलीत त्याने डबल महाराष्ट्र केसरीची गदा उंचविली. तेव्हापासून तो ट्रिपल केसरी होण्यासाठी झटत आहे. सांगवी स्पर्धेत पुण्याच्या विजय बनकरकडून हार  पत्करावी लागल्यापासून चंद्रहार मागे पडत गेला. आता पुन्हा त्याचे पुनरागमन भूगाव स्पर्धेत होत आहे. तो पुण्यात  नरसिंग, विजय चौधरीप्रमाणे तीन गदेचा वासरदार होण्यासाठीच दाखल होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com