महाराष्ट्रचा विदर्भावर डावाने विजय

महाराष्ट्रचा विदर्भावर डावाने विजय

सामनावीर अनुपम सांकलेचाचे सामन्यात १४ बळी

नागपूर - मध्यमगती गोलंदाज अनुपम संकलेचाच्या भेदक माऱ्याच्या जोरावर महाराष्ट्रने तिसऱ्याच दिवशी विदर्भाचा एक डाव व तीन धावांनी धुव्वा उडवून रणजी करंडक (‘ब’ गट) क्रिकेट स्पर्धेत यंदाच्या मोसमातील पहिल्या विजयाची नोंद केली. या विजयामुळे महाराष्ट्र संघाने गुणतालिकेत तिसरा क्रमांक मिळवत बादफेरीच्या आशा कायम ठेवल्या. त्याउलट विदर्भाचे बादफेरीचे आव्हान जवळजवळ संपुष्टात आले आहे. 

ईडन गार्डन्सवर दुसऱ्या दिवसअखेर १ बाद १४१ अशा मजबूत स्थितीत असलेल्या विदर्भाच्या फलंदाजांनी सकाळी मैदानात पाऊल ठेवले तेव्हा, अशाप्रकारचा लाजीरवाणा पराभव होईल, याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. पहिल्या डावात कर्दनकाळ ठरलेल्या संकलेचाने पुन्हा एकदा विदर्भाची दाणादाण उडवली. विदर्भाचा दुसरा डाव उपाहारापूर्वीच संपुष्टात आला. पहिल्या डावात अवघ्या २५ धावांत सात गडी बाद करणाऱ्या संकलेचाने दुसऱ्याही डावात ६९ धावांत तेवढेच गडी बाद केले. 

संकलेचाने कर्णधार फैज फजलला बाद करून विदर्भाच्या घसरगुंडीला सुरवात केली. त्यानंतर नियमित अंतराने गडी बाद होऊन विदर्भाचा दुसरा डाव २७० धावांत आटोपला. श्रीकांत वाघने सर्वाधिक ६९ धावा (७३ चेंडू, १० चौकार, १ षट्‌कार) काढल्या; परंतु त्याची आक्रमक खेळी महाराष्ट्रला बोनस गुण घेण्यापासून रोखू शकली नाही. सलामीवीर संजय (६७ धावा), फजल (५९ धावा) आणि अक्षय कर्णेवार (२३ धावा) या अन्य फलंदाजांना दोनआकडी मजल मारता आली. ‘मॅचविनिंग’ कामगिरीबद्दल ३४ वर्षीय संकलेचाला ‘सामनावीर’ पुरस्कार देण्यात आला. या विजयासह महाराष्ट्रने सात गुण पटकावून आपली गुणसंख्या १४ वर नेली; तर लागोपाठ दुसरा पराभव पत्करणाऱ्या विदर्भाचे पाच सामन्यांमध्ये केवळ सात गुण आहेत. विदर्भाचा यानंतर सामना २१ नोव्हेंबरपासून सौराष्ट्रविरुद्ध दिल्लीत खेळला जाणार असून, महाराष्ट्रची लढत आसामविरुद्ध चेन्नई येथे होईल.  

संक्षिप्त धावफलक : विदर्भ पहिला डाव : सर्वबाद ५९. महाराष्ट्र पहिला डाव : सर्वबाद ३३२. विदर्भ दुसरा डाव : सर्वबाद २७० (श्रीकांत वाघ ६९, संजय रामास्वामी ६७, फैज फजल ५९, अक्षय कर्णेवार ३३, अनुपम संकलेचा ७-६९, निकित धुमाळ २-६९, आर. त्रिपाठी १-२२).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com