असे ‘सुवर्ण’ अनुभव पुन्हा पुन्हा यावेत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

आशियाई स्पर्धेत महिलांच्या कबड्डीचा समावेश होऊन केवळ दोन स्पर्धा झाल्या आहेत. ही तिसरी स्पर्धा आहे. अर्थातच पहिल्या दोन्ही स्पर्धांत भारताने आपली मक्तेदारी राखली आहे. या वेळी देखील ते राखतील यात शंकाच नाही. या वेळच्या संघाबाबत म्हणाल, तर हा संघ पूर्णपणे अननुभवी आहे. अननुभव याचा अर्थ आंतरराष्ट्रीय स्तरावरील म्हणता येईल. तशा आपल्या मुली खूप कबड्डी खेळतात. त्यामुळे त्या ‘टच’मध्ये असतात. फरक इतकाच आहे की आशियाई स्पर्धेसारख्या मोठ्या व्यासपीठावर खेळताना कुठल्याच प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखून चालणार नाही. आज कबड्डी वाढलीय. इराणचा संघ चांगला असतोच, आता कोरिया संघही चांगली तयारी दाखवत आहे.

आशियाई स्पर्धेत महिलांच्या कबड्डीचा समावेश होऊन केवळ दोन स्पर्धा झाल्या आहेत. ही तिसरी स्पर्धा आहे. अर्थातच पहिल्या दोन्ही स्पर्धांत भारताने आपली मक्तेदारी राखली आहे. या वेळी देखील ते राखतील यात शंकाच नाही. या वेळच्या संघाबाबत म्हणाल, तर हा संघ पूर्णपणे अननुभवी आहे. अननुभव याचा अर्थ आंतरराष्ट्रीय स्तरावरील म्हणता येईल. तशा आपल्या मुली खूप कबड्डी खेळतात. त्यामुळे त्या ‘टच’मध्ये असतात. फरक इतकाच आहे की आशियाई स्पर्धेसारख्या मोठ्या व्यासपीठावर खेळताना कुठल्याच प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखून चालणार नाही. आज कबड्डी वाढलीय. इराणचा संघ चांगला असतोच, आता कोरिया संघही चांगली तयारी दाखवत आहे. दुसरे देश सराव करत आहेत. कबड्डीचे तंत्र ते अवगत करत आहेत. आपल्या मुलींनी ‘ओव्हरकॉन्फिडन्स’ राहता कामा नये.  त्यामुळेच त्यांना एकच सल्ला देते, की मनात सुवर्णपदक जिंकायचेच हे पक्के ठरवा आणि मैदानात उतरा. तुम्हाला सुवर्णपदक घेऊन यायचंच आहे. देशासाठी खेळणे आणि जिंकणे याचा आनंद काही वेगळाच असतो. तो तुम्ही कुठलेही दडपण न बाळगता घ्या. अगदी माझ्यासारखा.

आशियाई स्पर्धेत पुरुष कबड्डीचा समावेश झाल्यानंतर वीस वर्षांनी म्हणजे सहाव्या स्पर्धेत महिलांचा समावेश झाला. तेव्हाच भारतासाठी खेळायला मिळणार याचा आनंद झाला. पण जबाबदारीदेखील मोठी होती. स्पर्धेचे महत्त्वही वेगळे होते. त्यामुळे अन्य स्पर्धांप्रमाणे नाही, तर त्या वेळी आमचे आठ कॅम्प झाले होते. मोठ्या तयारीने स्पर्धेत उतरलो. लौकिकाला साजेशी खेळी केली. इराणचे आव्हान परतवून पहिले सुवर्ण मिळविले. विजयानंतर देशाचा तिरंगा फडकविताना झालेला आनंद आजही विसरता येत नाही. त्याचबरोबर क्रीडा ग्राममध्ये अन्य देशांतील तसेच परदेशांतील सर्वोत्तम खेळाडूंच्या सहवासामुळे खेळाकडे बघण्याला वेगळीच दृष्टी मिळाली. या अनुभवाने वेगळी ममता घडल्याची जाणीव झाली. २०१४ मध्ये दुसरे सुवर्णपदक पटकाविताना पुन्हा इराणचे आव्हान आले. त्यांची गजल ही प्रमुख खेळाडू होती. उत्तम चढाई करायची. पण त्यांच्या नियोजनाच्या अभावाचा फायदा आम्ही उठविला. ती मध्यरक्षक म्हणून उभी राहायची. तेव्हा चढाई करताना मी तिलाच लक्ष्य केले आणि ती अधिक चढाई करणार नाही याची काळजी घेतली. आमच्या बचावपटूंनीही चोख कामगिरी बजाविली. दुसरे सुवर्ण आमच्या गळ्यात पडले होते. देशासाठी सुवर्णपदक मिळविण्याचा अनुभव पुन्हा पुन्हा आयुष्यात यावा अशीच भावना त्या वेळी आम्हा प्रत्येक खेळाडूच्या मनात होती. 

शब्दांकन - ज्ञानेश भुरे

Web Title: Mamata Pujari Asian Games women's kabaddi