'सिंधू भारत की बेटी'; मग ही सुवर्णविजेती मानसी कोण?

वृत्तसंस्था
Wednesday, 28 August 2019

'हे सुवर्णपदक मिळविण्यासाठी मी प्रचंड कष्ट घेतले होते. आता मी अतिशय आनंदी आहे. माझा घाम आणि सर्व कष्ट कामी आले. हे माझे पहिले सुवर्णपदक आहे.' अशी प्रतिक्रिया मानसीने आपल्या फेसबुक अकाऊंटवर दिली आहे.

नवी दिल्ली : बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे जगभरातून कौतुक होत असतानाच आणखी एका भारतीय बॅडमिंटनपटूने आपले नाव सुवर्णपदकावर कोरल्याची माहिती समोर येत आहे. मानसी जोशी या भारतीय बॅडमिंटनपटूने वर्ल्ड पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले आहे. विशेष म्हणजे सिंधूने सुवर्ण पदक जिंकण्यापूर्वी काही तासच मानसीने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले होते. 

Manasi Joshi

स्विर्त्झलंडमधील बॅसेल येथे पार पडलेल्या वर्ल्ड पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत ती पारूल परमार यांच्याविरूद्ध लढली. अपंग असलेल्या मानसीला एक पाय नसल्याने तिला त्या ठिकाणी कृत्रिम पाय बसविण्यात आला आहे. अशा परिस्थित उत्तम खेळी करत तिने भारतासाठी सुवर्णपदक खेचून आणले. 'हे सुवर्णपदक मिळविण्यासाठी मी प्रचंड कष्ट घेतले होते. आता मी अतिशय आनंदी आहे. माझा घाम आणि सर्व कष्ट कामी आले. हे माझे पहिले सुवर्णपदक आहे.' अशी प्रतिक्रिया मानसीने आपल्या फेसबुक अकाऊंटवर दिली आहे.

30 वर्षीय मानसीच्या दुचाकीचा ट्रकला धडकून अपघात झाला होता. यात तिने डावा पाय गमावला, पण ती कुठेही न डगमगता पुन्हा उभी राहिली. तिने प्रोस्थेटीक लाईंब (कृत्रिम पाय) बसविला व पुन्हा आपल्या ध्येयाकडे मार्गस्थ झाली व तिने आपले ध्येय गाठले आहे, अशी प्रतिक्रिया मानसीचे वडिल गिरीश जोशी यांनी दिली.

मानसीही गोपीचंद यांचीच शिष्या!
मूळची राजकोटची असलेली मानसी गोपीचंद यांचीच शिष्या आहे. गोपीचंद यांच्या हैदराबाद येथील अॅकॅडमीमध्ये बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेत आहे. त्यामुळे गोपीचंद यांच्या सिंधू व मानसी या दोन्ही शिष्यांनी त्यांना सुवर्णपदकाची गुरूदक्षिणा देत त्यांचे नाव उंचावले आहे.

सोशल मीडियामध्ये मानसीवर कौतुकाचा प्रचंड वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या सर्व टीमचे ट्विटरवर अभिनंदन केले आहे. तर नेटकऱ्यांनी सिंधूच्या यशात मानसीचा विसर पडला अशीही खंत व्यक्त केली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manasi Joshi wins para world badminton championship