लंडन : मॅंचेस्टर सिटीने गतमोसमातील यशोमालिका जणू कायम राखताना कम्युनिटी ढाल जिंकली. त्यांनी पारंपरिक प्रतिस्पर्धी लिव्हरपूलला पेनल्टी शूटआऊटवर पराजित केले.
बदली गोलरक्षक क्लॉडिओ ब्राव्हो याने गॉर्गिनो विजनाल्दुम याची किक रोखत सिटीला 5-4 विजयी केले. या लढतीत निर्धारीत वेळेत 1-1 बरोबरी होती. "आगामी मोसमही सोपा नसणार हेच या लढतीतून दिसले. याची जाणीव खेळाडूंनाही झाली हे चांगलेच झाले,' असे सिटीचे व्यवस्थापक पेप गॉर्डिओला यांनी सांगितले.
सिटीने गतवर्षी कम्युनिटी ढाल, एफए कप, लीग कप तसेच प्रीमियर लीग जिंकली होती, तर लिव्हरपूलने चॅम्पियन्स लीग. सिटीचा खेळ विजेत्यास साजेसा नव्हता, पण लिव्हरपूलचा बचाव कमकुवत होता; तसेच त्यांचे आक्रमक गोलक्षेत्रात कोलमडले.
मोसमपूर्व अनेक सराव सामने अनेक ठिकाणी झाले. प्रवास इतका झाला होता, की नेमके कुठे आहोत तेच कळत नव्हते. याचा परिणाम नाही म्हटले तरी खेळावर होतोच, असे लिव्हपूलचे व्यवस्थापक जर्गन क्लॉप यांनी सांगितले.
|