सिटीचा सनसनाटी पराभव; लिव्हरपूलची सरशी

वृत्तसंस्था
रविवार, 15 सप्टेंबर 2019

मॅंचेस्टर सिटीला प्रीमियर लीगमध्ये नॉर्विच सिटीविरुद्ध सनसनाटी हार पत्करावी लागली; तर लिव्हरपूल, मॅंचेस्टर युनायटेड, चेल्सी यांनी महत्त्वाच्या लढतीत विजय मिळवला.

लंडन : मॅंचेस्टर सिटीला प्रीमियर लीगमध्ये नॉर्विच सिटीविरुद्ध सनसनाटी हार पत्करावी लागली; तर लिव्हरपूल, मॅंचेस्टर युनायटेड, चेल्सी यांनी महत्त्वाच्या लढतीत विजय मिळवला.

जानेवारीनंतर प्रथमच सिटीने प्रीमियर लीगमध्ये लढत गमावली. यामुळे आघाडीवरील लिव्हरपूल आणि सिटी यांच्यातील फरक पाच गुणांचा झाला. सिटीच्या सदोष बचावात्मक खेळाचा नॉर्विचने पुरेपूर फायदा घेतला. सादिओ मेन याच्या दोन गोलच्या जोरावर लिव्हरपूलने न्यूकॅसल युनायटेडला 3-1 असे हरवले होते. न्यूकॅसलने पहिला गोल केला; पण अखेर चेंडूवर पूर्वार्धात 80 टक्के हुकुमत राखलेल्या लिव्हरपूलचीच सरशी झाली.

सामन्याच्या सुरुवातीस गोल केल्यानंतरही मॅंचेस्टर युनायटेडला लिस्टर सिटीविरुद्ध 1-0 विजयावरच समाधान मानावे लागले. लिस्टरचा या मोसमातील हा पहिला पराभव. चेल्सीने वोल्वज्‌चा 5-2 पाडाव केला. तॅमी अब्राहमची हॅट्ट्रिक हे चेल्सीच्या विजयाचे वैशिष्ट्य. त्याने वीस मिनिटांत तीन गोल केले. टॉटनहॅम हॉटस्‌पूरने क्रिस्टल पॅलेसला 4-0 असे पराजित करताना पूर्वार्धातच सर्व गोल केले. यापूर्वीच्या चार लढतीत त्यांनी पाचच गुण मिळवले होते.

बेनझेमाचे दोन गोल
माद्रिद ः करीम बेनझेमाच्या दोन गोलमुळे रेयाल माद्रिदने ला लिगामध्ये लेवांतेचा 3-2 पाडाव केला; तर बार्सिलोनाने व्हॅलेन्सियाचा असा 5-2 धुव्वा उडवला. लिओनेल मेस्सीच्या अनुपस्थितीत आंसू फात्ती बार्सिलोनाच्या चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झाला आहे. तीन गोलांच्या पिछाडीनंतर लेवांतेने केलेले प्रयत्न अपुरे पडले आणि रेयालने सलग दोन बरोबरीनंतर विजय मिळवला. फातीने मैदानात ऊतरल्यानंतर चेंडूला पहिल्यांदाच स्पर्श केल्यानंतर गोल केला. टाळ्याच्या कडकडाटात त्याचे स्वागत झाले. त्याने एक गोल केला आणि एकाला साह्य केले.

बायर्नची बरोबरी
बर्लिन ः बायर्न म्युनिचला आरबी लिपझिगविरुद्ध बंडेस्लिगा अर्थात जर्मनी साखळीत 1-1 बरोबरीस सामोरे जावे लागले. नशीबाची साथ असल्यामुळे हार टाळू शकलो, हे बायर्न गोलरक्षक मॅन्यूएल नेऊर याचे मतच लढतीत काय घडले हे सांगू शकते. बायर्नचा पूर्वार्धातील झंझावात उत्तरार्धात लिपझिगने केवळ रोखलाच नाही, तर विजयाचीही शक्‍यता निर्माण केली होती. आता बायर्न तिसरे; तर लिपझिग अव्वल आहेत. बोरुसिया डॉर्टमंडने दुसरा क्रमांक मिळवताना लिव्हरकुसेनला 4-0 हरवले.

इंटर मिलान पुन्हा अव्वल
रोम ः इंटर मिलानने सिरी ए अर्थात इटालियन साखळीत अव्वल क्रमांक मिळवताना उदिनीजचा 1-0 असा पाडाव केला. तीन खेळाडूंच्या दुखापतीमुळे युव्हेंटिसला फ्लोरेंटिनाविरुद्ध गोलशून्य बरोबरी स्वीकारावी लागली. यामुळे इंटर मिलानने पुन्हा अव्वल क्रमांक मिळवला. ऍटलेटीको माद्रिदविरुद्धची चॅम्पियन्स लीगमधील लढत चार दिवसांवर असताना युव्हेंटिसला खेळाडूंची दुखापत जास्तच सलत असेल. ख्रिस्तियानो रोनाल्डोचा फारसा प्रभाव पडला नाही ही खंत युव्हेटिसला जास्त आहे. दरम्यान, नापोलीने लिव्हरपूलविरुद्धच्या लढतीचा सराव करताना क्‍लब सॅम्पदोरियास 2-0 असे हरवले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manchester city lost, Liverpool increases the lead