मॅंचेस्टर युनायटेडची शानदार सलामी 

वृत्तसंस्था
रविवार, 12 ऑगस्ट 2018

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या संघातील पॉल पॉग्बाने तिसऱ्याच मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर मिळवलेले यश आणि सामन्याच्या अंतिम क्षणी लुक शॉने केलेला गोल यामुळे मॅंचेस्टर युनायटेडने लिस्टर सिटीवर 2-1 अशी मात केली आणि यंदाच्या इंग्लिश प्रीमियर लीग मोसमाची शानदार सलामी दिली. 
 

लंडन - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या संघातील पॉल पॉग्बाने तिसऱ्याच मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर मिळवलेले यश आणि सामन्याच्या अंतिम क्षणी लुक शॉने केलेला गोल यामुळे मॅंचेस्टर युनायटेडने लिस्टर सिटीवर 2-1 अशी मात केली आणि यंदाच्या इंग्लिश प्रीमियर लीग मोसमाची शानदार सलामी दिली. 

रशियातील विश्‍वकरंडक यशानंतर प्रथमच मैदानात उतरणाऱ्या पॉग्बा मॅंचेस्टर युनायटेडचे प्रशिक्षक ज्योस मौरिन्हो याच्यावर नाराज असल्यामुळे तो हा क्‍लब सोडून बार्सिलोनात जाण्याच्या चर्चांना उधाण आले होते; परंतु मौरिन्हो यांनी पॉग्बालाच कर्णधार करून नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याने लगेचच पेनल्टी घेण्याचे धैर्यही दाखवले आणि गोलही केला. सामन्याच्या सुरवातीला लिस्टर सिटीच्या डॅनियल आर्मर्तीने हॅंडबॉल केल्यामुळे मॅंचेस्टरला पेनल्टी मिळाली होती. 

लिस्टर सिटीकडे नव्याने आलेला गोलरक्षक जेम्स मॅडिसनने गोलजाळ्याच्या दिशेने जाणारे काही फटके यशस्वीपणे अडवले. मॅंचेस्टरचा स्पेनमधला गोलरक्षक डेव्हिड डीगे याने मात्र मौरिन्होना विचार करायला लावणारे प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेतही डीगेच्या गोलरक्षणाचा स्पेनला फटका बसला होता. 

लिस्टरचा हुकमी खेळाडू रियाद मार्हेझ मॅंचेस्टर सिटीकडे गेला असला, तरी त्यांचा खेळ प्रेक्षणीय होता. त्यांची सुरवात भक्कम होती; मात्र उत्तरार्धात त्यांना सातत्य राखता आले नाही. पेनल्टी किकमुळे गोल स्वीकारावा लागलेल्या लिस्टर सिटीला बरोबरी साधण्याची संधी होती. लुक शॉला चकवून जेर्मी वेर्देने चांगली मुसंडी मारली होती; परंतु या वेळी डी गेने चेंडू अडवला. 

बेल्जियमचा स्टार आणि विश्‍वकरंडक स्पर्धेत प्रभाव पाडणारा रुमेलू लुकाकूला उत्तरार्धात मैदानात येण्याची संधी मिळाली. त्याला एक संधी मिळाली; परंतु त्याचा फटका थेट गोलरक्षकाच्या दिशेने होता. सात मिनिटांनंतर शॉने व्यावसायिक फुटबॉलमधील आपला पहिला गोल केला. या वेळी जुआन माटाने दिलेला पास मोलाचा होता. भरपाई वेळेत लिस्टर सिटीच्या वेर्देने गोल केला. 

विश्‍वकरंडकावरच मी समाधानी राहणार नाही. मला प्रीमियर लीग, चॅम्पियन्स लीग आणि युरोपियन लीग हे सर्व करंडक जिंकायचे आहेत, त्यासाठी सातत्याने विजय मिळवत राहायला लागतील. 
- पॉल पॉग्बा, मॅंचेस्टर युनायटेडचा खेळाडू 

 

Web Title: Manchester Uniteds fantastic opening