माणिक कारंडेचे दुःखही सोन्याचे

माणिक कारंडेचे दुःखही सोन्याचे


पुणे : वडिलांच्या निधनाचे दुःख विसरून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आखाड्यात उतरलेल्या कोल्हापूर शहरच्या माणिक कारंडे याने बुधवारपासून सुरू झालेल्या 60व्या राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अधिवेशनात माती विभागातील 65 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. स्पर्धेतील पहिल्या दिवशी झालेल्या कुस्ती लढतींत कोल्हापूर आणि पुण्याच्या मल्लांनी आपली छाप पाडली.


वारजे येथे उभारण्यात आलेल्या कै. रमेश वांजळे क्रीडानगरीत आज अभिनेता हार्दिक जोशी याच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. या वेळी पुणे महानगरपालिका आयुक्त कुणालकुमार, बाळासाहेब लांडगे, दीपक मानकर, सचिन दोडके, शुक्राचार्य वांजळे, योगेश दोडके, नामदेव मोहिते, बापूसाहेब पठारे, दिनेश गुंड आदी उपस्थित होते.
सकाळपासूनच लढतींना सुरवात झाली. पहिल्या लढतीपासून कोल्हापूरच्या माणिक कारंडने जबरदस्त कुस्त्या करून अंतिम फेरीत धडक मारली होती. पहिल्या लढतीपासून त्याची देहबोली काही वेगळेच सांगत होती. त्याला फक्त जिंकायचे होते आणि वडिलांचे स्वप्न साकार करायचे होते. काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराने वडील मधुकर यांचे निधन झाले. निधनानंतरचे दिवस उरकून बाराव्या दिवशी पठ्ठा आखाड्यात उतरला होता. कुणबी सहकारी साखर कारखान्याच्या आखाड्यात तानाजी पाटील यांच्याकडे सराव करणाऱ्या माणिकची अंतिम फेरीत कोल्हापूर जिल्ह्याच्या सोनबा गोंगाणेशी गाठ पडली होती. दोघेही हुशार मल्ल. कुस्ती रंगली होती. दोघांचे नियोजित सहा मिनिटांनंतर 3-3 असे गुण झाले होते. मात्र, लढतीत सोनबाला पंचांनी एकदा क्वॉशन म्हणजे ताकीद दिल्यामुळे विजयाची माळ माणिकच्या गळ्यात पडली.
माती विभागातील 57 किलो वजनी गटात पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इंदापूरच्या सागर मारकड याने निकाली कुस्ती करत उपस्थितांची वाहवा मिळविली. घरच्याच मारकड कुस्ती केंद्रात वडील मारुती मारकड यांच्याकडे मार्गदर्शन घेणाऱ्या सागरने वेगवान कुस्ती करताना सोलापूरच्या ज्योतिबा अटकळे याला अवघ्या चौथ्या मिनिटला कलाजंग डावावर अस्मान दाखवले.


गादी विभागातील लढतींचा निकाल गुणांवरच लागला. पुणे शहरच्या उत्कर्ष काळेने 65 किलो वजनी गटात पुणे जिल्हा संघाच्या सागर लोखंडे याला वर्चस्वाची संधीच दिली नाही. ताबा गुणांवर त्याने बाजी मारत सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर झालेल्या 57 किलो वजनी गटात कोल्हापूर जिल्ह्याच्या विजय पाटीलने कोल्हापूर शहरच्या अभिजित पाटील याचा गुणांवर पराभव करून सुवर्णयश मिळविले.


दरम्यान, आज दुपारच्या सत्रात डबल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, किरण भगत, समाधान पाटिल, सचिन येलभर, सागर बिराजदार, अभिजित कटके या "केसरी' गटातील प्रमुख मल्लांनी वजने दिली. साहजिकच या तगड्या मल्लांच्या सहभागामुळे उद्यापासून पुण्यातील कुस्तीशौकिनांना अधिक कौशल्यपूर्ण लढती बघायला मिळणार यात शंकाच नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com