मनिकास राष्ट्रकुल बक्षिसाची दिल्ली सरकारकडून प्रतीक्षाच 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या यशात मोलाचा वाटा उचललेल्या मनिका बत्रासला अजूनही दिल्ली सरकारने बक्षीस दिलेले नाही. या संदर्भातील प्रस्ताव अजूनही राज्य मंत्रिमंडळासमोर चर्चेस आहे. मनिकाने राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्य तसेच एक ब्रॉंझ अशी चार पदके जिंकली होती. 

दिल्ली सरकारच्या धोरणानुसार सुवर्णपदकास 14 लाख, रौप्यपदकास 10 लाख आणि ब्रॉंझसाठी सहा लाख दिले जातात. याचवेळी शेजारील हरियाना सरकार राष्ट्रकुल सुवर्णपदकासाठी दीड कोटी देते. दिल्लीचे क्रीडा उपसंचालक धरमेंदर सिंग यांनी मनिकाच्या बक्षीस रकमेची फाइल मंजुरीसाठी कॅबिनेटकडे पाठवली असल्याचे सांगितले. 

मनिकाने याबाबत टीका करणे टाळले. आत्तापर्यंत बक्षीस का मिळाले नाही, हे सांगणे अवघड आहे; पण ते नक्कीच मिळणार याची खात्री असल्याचे तिने सांगितले. केंद्र सरकारने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सांगता झाल्यावर दोन आठवड्यांतच पदक विजेत्यांचा सत्कार केला होता. मनिकाला पूर्ण साह्य करण्याचे आश्वासन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मे महिन्यात दिले होते; पण ठरलेले बक्षीस देण्यात मात्र दिरंगाई होत असल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली. 

Web Title: Manika Waiting for prize of the Delhi Commonwealth Games