मनू गोयतची दीड कोटीची ‘सुपर रेड’

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 31 मे 2018

भारतीय कबड्डीचा युवा चेहरा म्हणून नावारूपाला आलेला दीपक हुडा प्रो-कबड्डीच्या सहाव्या मोसमातील सर्वाधिक महागडा कबड्डीपटू ठरला. अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पॅंथसने त्याला 1 कोटी 15 लाख रुपयांना खरेदी केली. त्यापूर्वी इराणच्या फझल अत्राचेलीसाठी यू मुम्बाने 1 कोटी रुपये माजले

हरियानाने मोजले 1 कोटी 51 लाख; हुडा, तोमर, देवाडिगा, चौधरी, अत्राचली अन्य कोट्यधीश खेळाडू
मुंबई - प्रो-कबड्डीच्या इतिहासातील सर्वाधिक बोली सेनादलाच्या मनू गोयतसाठी हरियाना स्टिलर्सने लावली. सहाव्या मोसमासाठी बुधवारी झालेल्या लिलावात हरियानाने त्याला तब्बल १ कोटी ५१ लाख रुपयांना खरेदी केले. प्रो-कबड्डी लीगची लोकप्रियता वाढत असताना खेळाडूंचाही भाव वधरणार ही अपेक्षा आज खरी ठरली. मनूसह दीपक हुडा, नितीन तोमर (१ कोटी १५ लाख), राहुल चौधरी (१ कोटी २९ लाख), रिशांक देवाडिगा 
(१ कोटी ११ लाख), फझल अत्राचली (१ कोटी)  असे सहा खेळाडू या वेळी कोट्यधिश झाले. 

लिलावापूर्वी दीपक हुडा आणि राहुल चौधरी यांनी सर्वाधिक बोली लागणार असा अंदाज होता. त्यांना तशी बोली लागली देखील. मात्र, मनू गोयतची बोली ही लिलावातील सुपर रेड ठरली.   

अभिषेक बच्चनच्या जयपूर पिंक पॅंथसने दीपक हुडा, तर पुणेरी पलटणने नितीन तोमरला १ कोटी १५ लाख रुपयांना खरेदी केली. मुंबईकर रिशांक देवाडिगाला युपी योद्धाने कार्डचा वापर करत १ कोटी ११ लाख रुपयांना खरेदी केले. राहुल चौधरीला यु मुम्बाने १ कोटी २९ लाख रुपये मोजत खरेदी केले. मात्र, कार्डचा वापर करत युपी योद्धाजने तेवढीच किंमत देत त्याला आपल्याकडे कायम राखले. 

लिलावाला सुरवात झाली. पहिल्या दिवसातील परदेशी खेळाडूंच्या सत्रात इराणच्या खेळाडूंचा बोलबाला राहिल्यावर भारतीय खेळाडूंमध्ये दीपक हुडा सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला. तेलुगूने इराणच्याच अबोझर मिघानी याच्यासाठी जवळपास पाऊण कोटी रुपये मोजले.

भारतीय खेळाडूंच्या लिलावास संथ सुरवात झाली. श्रीकांत टिवाथिया, रणसिंग, मनजित चिल्लर, कुलदीप सिंग यांना फारशी बोली लागली नाही. मात्र, गतवर्षी पुण्याचा कर्णधार दीपक हुडाचे नाव पुकारल्यावर त्याच्यासाठी बोलीची स्पर्धा सुरू झाली. यातही हरियाना स्टिलर्स, दबंग दिल्ली आघाडीवर होते. 

सुरवातीपासून या दोन्ही फ्रॅंचाइजींनी रकमेचा धडाका लावला. हुडाची किंमत ९० लाखांच्या घरात गेल्यावर जयपूर पिंक पॅंथर्सने उडी घेतली आणि त्यांनी १ कोटी १५ लाख रुपये देत दीपकची खरेदी केली.

अत्राचलीस मोठी किंमत मिळणे अनपेक्षित नव्हते. गेल्याच मोसमात त्याने पकडीचे १०० गुण नोंदवणारा पहिला परदेशी  खेळाडू होण्याचा मान मिळवला होता; पण गुजरात फॉर्च्युन जायंटस्‌ने त्याला न राखण्याचे ठरवले. प्रो कबड्डीतील कामगिरीमुळे अत्राचली सर्वांच्याच ‘रडार’वर होता. प्रत्यक्षात लिलावात अखेर पर्यंत मुम्बासह जयपूर शर्यतीत राहिले होते.

यू मुम्बाने अत्राचलीच नव्हे, तर इराणी खेळाडू मिळवण्यासाठी सर्वाधिक स्पर्धा केली. त्यांनी हादी ताजिक (११ लाख) आणि अबोलफझल माघसोदलोमाहाली (२१.७५ लाख) यांनाही पसंती दिली. बचाव भक्कम असण्यास आमची पसंती होती. 

नीलेश शिंदेची माघार
दबंग दिल्लीचा माजी कर्णधार नीलेश शिंदे याला प्रो-कबड्डी लीगमधून काढल्याचे संयोजकांनी लिलाव सुरू होण्यापूर्वीच जाहीर केले. मात्र दुखापतीमुळे आपण लिलावातून माघार घेतल्याचे नीलेशने सांगितले; तर त्याने कौटुंबिक कारणास्तव माघार घेतली असल्याचे समजते.

लिलावात पहिल्या दिवशी
    भारतीय अनुभवी खेळाडूंकडे फ्रॅंचाइजींनी पाठ फिरवली.
    मनजित चिल्लरला (२० लाख) बेस प्राइसला तमिळ थलैवाजने घेतले, अनुप कुमारसाठी जयपूरने मोजले अवघे ३० लाख
    परदेशी खेळाडूंमध्ये इराणचा बोलबाला
    कोरियाच्या जान कुन ली याला बंगालने (३३ लाख) कायम राखले
    नवोदित खेळाडूंतील ८७ पैकी १४ खेळाडूंचीच पहिल्या दिवशी निवड
    पाटणा, बंगळूरने कोणालाच घेतले नाही, तर मुंबई, तेलुगु आणि गुजरातकडून तिघांची निवड

Web Title: Manu goyat Rahul Chaudhary Deepak Hooda Kabaddi Player