सिंधूच्या दोन विजयांमुळे यशस्वी सलामी 

वृत्तसंस्था
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

मुंबई : साईना नेहवालविनाच अखेर भारतीय महिला बॅडमिंटन संघ आशियाई स्पर्धेत सहभागी झाला. त्यांनी विजयी सलामी देताना हॉंगकॉंगचे कडवे आव्हान 3-2 असे परतविले. सिंधू एकेरीप्रमाणेच दुहेरीतही खेळल्यामुळे भारतास विजय लाभला. 

मुंबई : साईना नेहवालविनाच अखेर भारतीय महिला बॅडमिंटन संघ आशियाई स्पर्धेत सहभागी झाला. त्यांनी विजयी सलामी देताना हॉंगकॉंगचे कडवे आव्हान 3-2 असे परतविले. सिंधू एकेरीप्रमाणेच दुहेरीतही खेळल्यामुळे भारतास विजय लाभला. 

मलेशियातील या स्पर्धेत सिंधूने भारतास विजयी सुरवात करून देताना यिप पुई यिन हिला दोन गेममध्येच हरविले. भारताला या विजयाचा आनंद फार काळ लाभला नाही. अश्‍विनी पोनप्पा - प्राजक्ता सावंतने दुहेरीची; तर साई कृष्णा प्रियाने एकेरीची लढत गमावल्याने भारताची पीछेहाट झाली. अखेर सिंधूने एन. सिक्की रेड्डीच्या साथीत दुहेरीची लढत जिंकत भारतास बरोबरी साधून दिली. पाऊण तास चाललेल्या या लढतीने सिंधूचाही कस लागला. 

सिंधू दोन दिवसांपूर्वी इंडिया ओपन स्पर्धेची अंतिम लढत खेळली होती. रविवारी झालेली ही लढत तीन गेमपर्यंत लांबली होती. त्यानंतर सोमवारी प्रवास केल्यानंतर मंगळवारी ती दोन लढती खेळली आणि भारताच्या विजयात मोलाची भर टाकली. सिंधूचे प्रयत्न सत्कारणी लावताना ऋत्विका शिवानी गाडे हिने पहिला गेम गमावल्यावर लढत जिंकली, त्यामुळे भारतास ही लढत जिंकता आली. भारताने या लढतीत गेमच्या बाबतीत 8-6; तर गुणांच्या बाबतीत 269-254 असे वर्चस्व राखले. 

शुक्रवारी इंडिया ओपनमधील लढत खेळतानाच साईना पूर्ण तंदुरुस्त नव्हती. तिचा घोटा तर दुखत होताच, आता पोटरीही त्रास देत आहे, असे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय बॅडमिंटन संघटनेचे सचिव अनुप नारंग यांनी साईनास आशियाई स्पर्धेत खेळण्याची आग्रहाची विनंती करू, असे सांगितले होते. 

निकाल 
महिला :
भारत वि.वि. हॉंगकॉंग 3-2 (पी. सिंधू वि.वि. यिप पुई यिन 21-12, 21-18, अश्‍विनी पोनप्पा-प्राजक्ता सावंत प.वि. एनजी विंग युंग-येऊंग एन्गा टिंग 22-20, 20-22, 10-21, एसकेपी कुद्रावेली प.वि. चेऊंग यिंग मेई 19-21, 21-18, 20-22, पी. सिंधू-एन. सिक्की रेड्डी वि.वि. एनजी त्झ याऊ-युईन सिन यिंग 21-15, 15-21, 21-14, ऋत्विका शिवानी गड्डे वि. वि. येऊंग सुम यी 16-21, 21-16, 21-13. 
पुरुष : भारत वि.वि. फिलिपाइन्स 5-0 (के. श्रीकांत वि.वि. रॉस लिओनार्ड पेड्रोसा 21-11, 21-12, मनू अत्री-बी. सुमीथ रेड्डी वि.वि. कार्लोस ऍन्टोनी क्‍यानन-फिलिप जोपर स्कूएटा 21-15, 21-13, बी. साईप्रणित वि.वि. ऑर्थर सॅम्युएल साल्वाडो 21-16, 21-10, एम.आर. अर्जुन-श्‍लोक रामचंद्र वि.वि. पीटर गॅब्रिएल मॅग्नाई-अल्विन मोरादा 21-18, 21-17, समीर वर्मा वि.वि. लांझ राल्फ झाफ्रा 21-15, 21-12.

Web Title: marathi news badminton PV Sindhu Saina Nehwal