विकेट मोजायचे बंद केले - झूलन 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

भारताने कितीही धावा केल्या असल्या तरी गोलंदाजीची सुरवात आपण करायची आहे, याचे माझ्यावर दडपण असते, त्यामुळे मला अनेकदा जेवणही जात नाही. क्वचितच सामन्याच्या दिवशी मी दुपारी जेवले असेन. आम्ही जेव्हा महत्त्वाच्या लढतीत खेळत असतो, त्या वेळी वाढती जबाबदारी असल्याची जास्त जाणीव होते. 
- झूलन गोस्वामी 

डर्बन -  मी किती विकेट घेतल्या, हे मोजणे थांबवले आहे. त्या मोजायला सुरवात केल्यावर विकेट दुरावतात, असे झूलन गोस्वामीने सांगितले. सर्वाधिक बळींचा विश्‍वविक्रम केल्यावर घेतलेली प्रत्येक विकेट ही पुढचा टप्पाच गाठत असते, असेही तिने सांगितले. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झूलनने विकेटचे द्विशतक पूर्ण केले. "विकेटच्या सर्वाधिक विक्रमापासून काही विकेट दूर होते, त्या वेळी किती विकेट घेतल्या, आता विक्रमासाठी किती हव्या आहेत हे मोजत होते. त्यामुळेच तो टप्पा गाठण्यास अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. त्यानंतर मी विकेट मोजणे थांबवले. विकेट घेण्यासाठी जे काही करावे लागते, त्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले. माझी तयारी योग्य असेल, त्याची योग्य अंमलबजावणी केली तर विकेट मिळतच राहतील याची खात्री आहे', असे झूलनने सांगितले. 

मी दोनशे बळींचा टप्पा गाठला, यापेक्षा भारताने आफ्रिकेविरुद्धची सलग दुसरी लढत जिंकली. आम्ही मालिका जिंकली, हे महत्त्वाचे आहे. माझ्या विक्रमी कामगिरीचा संघाला फायदा झाला तर ते महत्त्वाचे आहे. मी गाठलेल्या दोनशे बळींच्या टप्प्यापेक्षा मालिका विजयामुळे भारतीय संघास मिळालेले दोन गुण जास्त मोलाचे आहेत, असेही तिने सांगितले. 

मला सर्व दोनशे विकेट लक्षात आहेत. सामन्यात मोक्‍याच्यावेळी घेतलेल्या विकेट या माझ्यासाठी स्पेशल असतात. या सर्व विकेट सारख्याच मोलाच्या आहेत. सर्व विकेट योजनाबद्ध खेळाचेच यश आहेत. त्याची क्रमवारी करणे मला आवडणार नाही, असेही तिने स्पष्ट केले. 

 

Web Title: marathi news jhulan goswami cricket sports