फराहच्या मुसंडीसमोर प्रतिस्पर्धी निरुत्तर 

वृत्तसंस्था
रविवार, 6 ऑगस्ट 2017

लंडन : ब्रिटनच्या 34 वर्षीय मो फराहच्या शेवटच्या टप्प्यातील सुसाट वेगासाठी प्रतिस्पर्ध्यांकडे सध्या उत्तर नाही, हे पुन्हा सिद्ध झाले. त्याने 16 व्या जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेत दहा हजार मीटरची शर्यत जिंकली आणि लांब पल्ल्याच्या सर्वकालीन महान धावपटूंत स्थान मिळविले. 

लंडन : ब्रिटनच्या 34 वर्षीय मो फराहच्या शेवटच्या टप्प्यातील सुसाट वेगासाठी प्रतिस्पर्ध्यांकडे सध्या उत्तर नाही, हे पुन्हा सिद्ध झाले. त्याने 16 व्या जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेत दहा हजार मीटरची शर्यत जिंकली आणि लांब पल्ल्याच्या सर्वकालीन महान धावपटूंत स्थान मिळविले. 

सोळा वर्षांपासून सुरू असलेल्या सुवर्णपदकाचा दुष्काळ संपविण्यासाठी केनियाने ही शर्यत प्रतिष्ठेची केली होती. तुम्ही 'सुसाइड मिशन'वर आहात, असा संदेशच केनियाच्या तिन्ही स्पर्धकांना देण्यात आला होता. फराह शेवटच्या टप्प्यात टिकाव धरू शकणार नाही, असेच डावपेच निश्‍चित करून धावा, असे सांगण्यात आले होते. मात्र, फराहने या सर्वांवरच मात केली. सुरवातीला त्याने नेहमीप्रमाणे मागे राहणेच पसंत केले. शर्यत सुरू झाली त्या वेळी केनिया, इथिओपिया व युगाडांचे धावपटू वेगाने पळत होते. त्याचवेळी फराह प्रेक्षकांना व परिवारातील सदस्यांच्या दिशेने हात हलवून आनंद घेत होता. काही वेळाने त्याने वेग वाढविला. 

शर्यत जशी पुढे सरकत होती, तसे केनिया व युगाडांचे धावपटू एकमेकांना साथ देत वेग वाढवत होते. त्यात माजी विश्‍व ज्युनियर विजेता जोशवा चेपतेगई व त्याचा सरावातील सहकारी केनियाचा विश्‍व क्रॉस कंट्री विजेता जेफ्री कामवोरूर आघाडीवर होते. त्यांना कधी केनियाचा पॉल तनुई, इथिओपियाचा जमाल यिमीर आणि अबादी हदीस साथ देत होता. फराहने मात्र, आघाडीचा जथ्था कधीही आपल्या टप्प्याबाहेर जाणार नाही, याविषयी खबरदारी घेतली. दहापैकी नऊ किलोमीटर शर्यतीवर केनिया, युगांडा व इथिओपियाच्या धावपटूंचे वर्चस्व होते. शेवटचा किलोमीटरमध्ये मात्र, फराहने आपल्या डावपेचाप्रमाणे इतरांना धावायला लावले. तीनशे मीटर अंतर शिल्लक असताना तनुईचा धक्का लागून फराह अडखळला होता. क्षणाचाही विलंब न लावता त्याने स्वतःला सावरले आणि सुसाट धाव घेत सुवर्णपदक (26 मि.49.51 सेकंद) जिंकले. चेपतेगईने रौप्य (26ः 49.94) आणि तनुईने ब्रॉंझ (26ः50.60) जिंकले. शर्यत पूर्ण करताना भावनिक झालेल्या फराहने आपल्या मुला-मुलींसोबत मैदानाला विजयी फेरी मारली. आठशे मीटरचे माजी ऑलिंपिक विजेते व आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्‍स संघटनेचे अध्यक्ष सॅबिस्टीयन को यांच्या हस्ते फराहला सुवर्णपदक बहाल करण्यात आले. 

हेंडरसन, सुहर स्पर्धेबाहेर 
रिओ ऑलिंपिकमध्ये लांब उडीत सुवर्णपदक जिंकणारा अमेरिकेचा जेफ हेंडरसन अंतिम फेरीसाठी पहिल्या बारा खेळाडूंत स्थान मिळू शकला नाही. तो फक्त 7.68 मीटर अंतरापर्यंतच उडी मारू शकला. पाच वर्षांपूर्वी लंडन ऑलिंपिकमध्ये पोल व्हॉल्टचे सुवर्णपदक जिंकणारी अमेरिकेची जेनिफर सुहरही स्पर्धेबाहेर गेली. 4.55 मीटर अंतरावर ती तीनदा अपयशी ठरली. 

बोल्ट, गॅटलीन, ब्लेकची आगेकूच 
स्पर्धेचे आकर्षण असलेल्या शंभर मीटर शर्यतीत जमैकाचा उसेन बोल्ट, योहान ब्लेक, ज्युलियन फोर्टे, अमेरिकेचा जस्टिन गॅटलीन, ख्रिस्तीयन कोलमन, जपानचा अब्दुल हकीम ब्राऊन, माजी आशियाई विजेता चीनचा सु बिंगतान, बहरीनचा अँड्य्रू फिशर, फ्रान्सचा जिमी विकट या प्रमुख धावपटूंनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. 

मो फराहचा शर्यतीतील क्रम व वेळ 

 • 1000 मीटर - 17 - 2 मि.42.14 से. 
 • 2000 - 17 - 5 मि. 28.33 से. 
 • 3000 - 16 - 8 मि. 11.53 से. 
 • 4000 - 2 - 10 मि. 53.99 से. 
 • 5000 - 11 - 13 मि. 36.20 से. 
 • 6000 - 7 - 16 मि. 18.25 से. 
 • 7000 - 6 - 19 मि. 02.78 से. 
 • 8000 - 5 - 21 मि. 41.66 से. 
 • 9000 - 6 - 24 मि. 20.51 से. 
 • 10000 - 1- 26 मि. 49.51 से. 

'ही माझ्या जीवनातील सर्वांत अवघड शर्यत होती. प्रतिस्पर्धी धावपटूंनी खूप डावपेच वापरले. मात्र, घरच्या प्रेक्षकांपुढे पराभूत व्हायचे नाही, असा निर्धार केला होता आणि मानसिकदृष्ट्या मी कणखर होतो, त्यामुळेच सुवर्णपदक जिंकू शकलो.' 
- मो फराह 

महत्त्वाचे 

 • विश्‍व ऍथलेटिक्‍स स्पर्धेतील फराहचे दहा हजार मीटर शर्यतीतील सलग तिसरे सुवर्ण 
 • यापूर्वी इथिओपियाच्या केनेनिसा बेकेले आणि हॅले गॅब्रेसलासी यांनी प्रत्येकी सलग चार सुवर्णपदके मिळविली आहे. 
 • फरहाने नोंदविलेली वेळ त्याच्या कारकिर्दीतील दुसरी वेगवान वेळ. 
 • विश्‍व व ऑलिंपिकमधील मिळवून सलग दहावे. 
 • स्पर्धेच्या इतिहासातील दुसरी वेगवान वेळ. 
 • केनियाच्या पॉल तनुईला सलग तिसऱ्यांदा दहा हजार मीटरमध्ये ब्रॉंझ 
 • विश्‍व स्पर्धेत दहा हजार मीटरमध्ये पदक जिंकणारा जोशवा चेपतेगई युगांडाचा पहिला धावपटू 
 • पहिल्या सात धावपटूंनी 27 मिनिटांच्या आत शर्यत पूर्ण केली. 

मोनिका अठारे आज धावणार 
महिलांची मॅरेथॉन रविवारी भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडेसहाला सुरू होणार असून, यात नाशिकची मोनिका अठारे धावणार आहे. तिचा 'बिब नंबर' 174 आहे. गेल्यावर्षी रिओ ऑलिंपिकमध्ये मोनिकाची सहकारी कविता राऊतने मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. याशिवाय दुपारी पुरुष मॅरेथॉनमध्ये टी. गोपी, महिला चारशे मीटरमध्ये आशियाई विजेती निर्मला, महिला भालाफेकीत अनू राणी आणि पुरुषांच्या 110 हर्डल्समध्ये मुंबईकर सिद्धांत थिंगलिया सहभागी होणार आहे. 

भारतीयांकडून निराशा 
आशियाई ऍथलेटिक्‍स स्पर्धेत तब्बल 42 वर्षांनंतर चारशे मीटरमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा महम्मद अनस पहिल्याच फेरीत गारद झाला. प्राथमिक फेरीत तो (45.98 सेकंद) चौथा आला. त्याची सर्वोत्तम वेळ 45.32 सेकंद आहे. महिलांच्या शंभर मीटर शर्यतीत द्युतीचंदही पहिल्या फेरीचा अडथळा पार करू शकली नाही. प्राथमिक फेरीत ती सहावी (12.07 सेकंद) आली. हेप्टथलॉनमध्येही स्वप्ना बर्मन प्रभाव टाकू शकली नाही. 100 हर्डल्समध्ये 14.14 सेकंद वेळेसह प्राथमिक फेरीत ती तिसरी आली. तिने 959 गुण मिळविले. तिची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ 13.90 सेकंद आहे. उंच उडीत ती 1.74 मीटरवर उडी मारू शकली. तिला त्यात 867 गुण मिळाले. यात तिची सर्वोत्तम कामगिरी 1.87 मीटर आहे.

Web Title: marathi news marathi website sports news Mo Farah Usain Bolt