हिंगोलीच्या गणेशचा चंद्रहारला धक्का 

हिंगोलीच्या गणेशचा चंद्रहारला धक्का 

पुणे : हिंगोलीच्या गणेश जगतापने 61व्या राज्य वरिष्ठ कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी गटात सर्वाधिक धक्कादायक निकाल नोंदविला. त्याने 'डबल महाराष्ट्र केसरी' चंद्रहार पाटीलला चितपट केले. अभिजित कटके, सागर बिराजदार यांनी विजयी सलामी दिली. 

समस्त ग्रामस्थ भूगाव, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ व मल्लसम्राट प्रतिष्ठान यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने भूगाव येथील कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत ही स्पर्धा सुरू आहे.

गादी विभागात सांगलीच्या चंद्रहारचे पारडे जड मानले जात होते. ही कुस्ती पाहण्यासाठी गर्दी झाली होती. गणेशने पहिल्याच फेरीत दुहेरी पट काढला. यानंतर चंद्रहार पाटीलने 'फ्रंट साल्तो' डाव टाकण्याचा प्रयत्न केला; पण त्यात त्याला यश आले नाही. यानंतर अवघ्या दीड मिनिटात गणेशने चंद्रहारला चितपट केले. 

शिवराजला दुखापत 
पुणे शहरच्या अभिजितची सलामीची लढत पुणे जिल्ह्याच्या शिवराज राक्षेविरुद्ध होती. दुखापतीमुळे शिवराजने ही लढत सोडली. त्या वेळी अभिजित 7-2ने आघाडीवर होता. अभिजितने सुरवातीपासूनच आक्रमक खेळ करण्यास सुरवात केली आणि 3 गुणांची कमाई केली. यानंतर शिवराजने दुहेरी पटाची पकड करून 2 गुणांची कमाई केली. मध्यंतरानंतर अभिजितने आक्रमक खेळ कायम राखला; पण शिवराजला दुखापत झाल्याने मैदान सोडावे लागले. 

बिराजदारची विक्रांतवर मात 
लातूरच्या सागरसमोर पहिल्या फेरीत मुंबई पूर्वच्या विक्रांत जाधवचे आव्हान होते. सागरने 4-0 असा विजय मिळविला. पहिल्या फेरीत सुरवातीला दोन्ही मल्लांनी एकमेकांचा अंदाज घेत खेळ केला. यानंतर सागरने एक गुण घेत आघाडी घेतली. दोन्ही मल्लांनी नकारार्थी कुस्ती करायला सुरवात केली. मात्र, सागरने वेळीच सावरत आपले कौशल्य दाखवले. त्याने साल्तो डाव टाकला आणि गुणांची कमाई केली. सागरने विक्रांतला नंतर फारशी संधीच दिली नाही. 

अक्षयची सचिनवर मात 
बीडच्या अक्षय शिंदेने पुण्याच्या सचिन येलभरला नमविले. ही कुस्ती काहीशी वादग्रस्त ठरली. पहिल्या फेरीत सुरवातीला सचिनने पहिला गुण घेतला. अक्षयने सचिनला तोडीस तोड लढत दिली. पहिल्या फेरीअखेर सचिन 3-2 ने आघाडीवर होता. दुसऱ्या फेरीत दोन्ही मल्लांनी वेळकाढूपणा केला; पण लढत संपायला आणि अक्षयने गुण घेण्याची एकच वेळ झाली. नियमानुसार अखेरचा गुण घेणारा मल्ल विजयी ठरतो, त्यामुळे पंचांनी अक्षयला विजयी ठरविले; पण वेळ संपल्याचा सचिन समर्थकांचा दावा होता. त्यामुळे दोघांच्या समर्थकांनी गोंधळ घालायला सुरवात केली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे आणि आयोजकांनी मध्यस्थी केली. यानंतर पोलिसांनाही समर्थकांना आवर घालण्यासाठी यावे लागले. अखेर पंचांचा निर्णय कायम ठेवून अक्षयला विजयी घोषित करण्यात आले. 
दरम्यान, माती गटात सोलापूरच्या माउली जमदाडेने नगरच्या योगेश पवारला चितपट केले, तर गोकूळ आवारेने किरण भगतला पुढे चाल दिली. याच गटात साईनाथ रानवडे, बाळा रफीक, विलास डोईफोडे यांनी आपले आव्हान राखले. 

सौरभ पाटीलला सुवर्ण 
कोल्हापूर जिल्ह्याच्या सौरभ पाटीलने वरिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेत गादी विभागात 61 किलो गटात सुवर्णपदक मिळवले. सौरभ पाटीलने अंतिम फेरीत सोलापूरच्या आबासाहेब अटकळेवर 4-0 ने मात केली. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत आबासाहेबने पुणे जिल्ह्याच्या तुकाराम शितोळेचे आव्हान 6-4 ने परतवून लावले. तर, दुसऱ्या उपांत्य लढतीत सौरभ पाटीलने कल्याणच्या जयशे साळवीवर 7-0 ने विजय मिळवला. यानंतर तुकाराम शितोळे आणि प्रकाश कोळेकर यांनी ब्रॉंझपदकाची कमाई केली. ब्रॉंझपदकासाठीच्या लढतीत तुकारामने अहमदनगरच्या सागर राऊतला चितपट केले, तर सांगलीच्या प्रकाशने कल्याणच्या जयेशवर 6-0ने विजय मिळवला. 

प्रसादला सुवर्ण 
गादी विभागात 86 किलो गटात पिंपरी- चिंचवडच्या प्रसाद सस्तेने सुवर्णपदक मिळवले. त्याने अंतिम फेरीत साताऱ्याच्या संजय सूळवर मात केली. तत्पूर्वी, उपांत्य फेरीत प्रसादने कोल्हापूर जिल्ह्याच्या हृषीकेश पाटीलला 9-3 ने नमविले, तर संजयने अहमदनगरच्या अक्षय कावरेवर 8-4 ने विजय मिळवला. हृषीकेश आणि अक्षयने ब्रॉंझपदक मिळवले. ब्रॉंझपदकाच्या लढाईत हृषीकेशने सोलापूर जिल्ह्याच्या शिवाजी पवारला 10-0 ने, तर अक्षयने धुळ्याच्या मयूर लोकरेला 10-0 ने नमविले. 

निकाल : महाराष्ट्र केसरी गट - माती विभाग - दुसरी फेरी - तानाजी झुंजुरके वि.वि. हेमंत गरुड, कपिल सनगर वि.वि. कुणाल शेळके, पोपट घोडके वि.वि. शकील पठाण, नवनाथ पालवे वि.वि. राहुल पवार, वालरफीक शेख वि.वि. सुनील रेवनकर, विलास डोईफोडे वि.वि. अतुल पाटील, अनंत मढवी वि.वि. खंडू चिंचपाडकर, साईनाथ रानवडे वि.वि. उदयराज पाटील, ज्ञानेश्वर जमदाडे वि.वि. योगेश पवार, किरण भगत पुढे चाल वि. गोकूळ आवारे, शुभम जाधव वि.वि. उमेश ठाकरे, देविदास घोडके वि.वि. तन्वीर शेख, ज्ञानेश्वर गोचडे वि.वि. अनिल गुंजाळे, आमीष मोरे वि.वि. चेतन सोनटक्के, राजेंद्र राजभाने वि.वि. वैभव तुपे, सूरज निकम वि.वि. विजय धुमाळ. 
 

गादी विभाग - पहिली फेरी - शुभम जैस्वाल वि.वि. हर्षद माळी, विष्णू खोसे वि.वि. भरत जोंजाळकर, महादेव सरगर वि.वि. राहुल, दत्ता धनके वि.वि. प्रतीक भक्त, कौतुक डाफळे वि.वि. अतिक शेख, गौरव गणोरे वि.वि. दिग्विजय देवकाते, महेश वि.वि. कुलदीप पाटील, मोहसीन सौदागर वि.वि. ए. शेख.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com