मुरीले अहुरेचे सोनेरी स्वप्न साकार

वृत्तसंस्था
रविवार, 4 मार्च 2018

बर्मिंगहॅम : आयव्हरी कोस्टच्या 30 वर्षीय मुरीले अहुरे हिने विश्‍व इनडोअर ऍथलेटिक्‍स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे आपले स्वप्न अखेर पूर्ण केले. यापूर्वी तिला दोनदा रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. तिची देशवासी मेरी जोस टुलू हिने रौप्यपदक जिंकून अमेरिका, जमैकाच्या वर्चस्वाला तडा दिला. 

बर्मिंगहॅम : आयव्हरी कोस्टच्या 30 वर्षीय मुरीले अहुरे हिने विश्‍व इनडोअर ऍथलेटिक्‍स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे आपले स्वप्न अखेर पूर्ण केले. यापूर्वी तिला दोनदा रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. तिची देशवासी मेरी जोस टुलू हिने रौप्यपदक जिंकून अमेरिका, जमैकाच्या वर्चस्वाला तडा दिला. 

बर्मिंगहॅम मुरीलेसाठी नेहमीच "लकी' ठरले आहे. कारण 2013 मध्ये येथेच तिने 6.99 सेकंदाची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ दिली होती. येथे चौथ्या लेनमधून पळताना तिने वेगवान प्रारंभ केला आणि दिमाखात 6.97 सेकंद अशी सर्वोत्तम वेळ देत सुवर्णपदक जिंकले. मेरी जोसने 7.05 सेकंद वेळ देत रौप्य जिंकले. स्वित्झर्लंडच्या मुजिंगा कम्बुंडजी हिने जागतिक पातळीवरील पहिले पदक जिंकताना 7.05 सेकंद अशीच वेळ दिली. "फोटो फिनिश'मध्ये तिला तिसरे स्थान मिळाले. ऑलिंपिक विजेत्या जमैकाच्या एलीन थॉम्पसनला चौथे आणि दोनशे मीटरमधील विश्‍वविजेत्या डाफने शिफर्सला पाचवे स्थान मिळाले. 

पुरुषांच्या लांब उडीत चांगलीच चुरस पाहायला मिळाली. क्‍यूबाच्या 19 वर्षीय जुआन इचेवारियाने विश्‍वविजेत्या दक्षिण आफ्रिकेच्या लुवो मयोंगावर अवघ्या दोन सेंटिमीटरने मात करीत सुवर्णपदक जिंकले. यामुळे विश्‍व इनडोअर स्पर्धेत फिल्ड इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकणारा सर्वांत कमी वयाचा (19 वर्षे 203 दिवस) खेळाडू ठरला. जुआनने 8.46, तर मयोंगाने 8.44 मीटर अंतरावर उडी मारली. 

महिलांच्या गोळाफेकीत हंगेरीच्या अनिता मार्टनने 19.62 मीटर अंतरावर गोळा फेकत सुवर्णपदक जिंकले. जमैकाच्या डॅनियल थॉमसला रौप्य आणि चीनच्या माजी आशियाई विजेत्या लिजाव गॉंगला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. 

दृष्टिक्षेपात 

  • मुरीलेची वेळ वर्ल्ड इनडोअरमधील सर्वकालीन सहावी वेगवान वेळ 
  • 1985 पासून प्रथमच एकही अमेरिकन धावपटू अंतिम फेरीत नाही 
  • एकाच देशाच्या खेळाडूंना सुवर्ण व रौप्य मिळण्याची ही 2006 नंतरची पहिली वेळ 
  • 2006 मध्ये अमेरिकेच्या धावपटूंनी सुवर्ण व रौप्य जिंकले होते 
  • गोळाफेकीत सुवर्ण जिंकून अनिता मार्टन हंगेरीची पहिली विश्‍व इनडोअर विजेती ठरली.
Web Title: marathi news Wold Indoor Athletics Ivory Coast Murielle Ahoure