Marnus Labuschagne Sleeping : डुलकी काढणाऱ्या मार्नसची सिराजनं उडवली झोप; ड्रेसिंग रूममधील Video व्हायरल | Cricket News In Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marnus Labuschagne Sleeping Video

Marnus Labuschagne Sleeping : डुलकी काढणाऱ्या मार्नसची सिराजनं उडवली झोप; ड्रेसिंग रूममधील Video व्हायरल

Marnus Labuschagne Sleeping Video : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील WTC Final च्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले. अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांनी सातव्या विकेटसाठी 109 धावांची शतकी भागीदारी रचली. त्यामुळे भारतीय संघ पहिल्या डावात 296 धावांपर्यंत पोहचू शकला. 71 धावांवर भारताचे 4 फलंदाज बाद झाल्यानंतर कांगारू भारताला तिसऱ्या दिवशी स्वस्तात गुंडाळणार असे वाटत होते. मात्र तसे झाले नाही. भारताने कांगारूंना चांगलेच दमवले.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने भारताला 296 धावात गुंडाळल्यानंतर कांगारूंनी आपला दुसरा डाव सुरू केला. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा फलंदाजी करण्यासाठी खेळपट्टीवर आले. हे दोघे चांगली फलंदाजी करतील अशी अपेक्षा ठेवून मार्नस लाबुशेनने एक डुलकी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र मार्नसच्या या झोपेत डेव्हिड वॉर्नरने खोडा घातला.

दुसऱ्या डावाची चार षटके होतात ना होताच तोच डेव्हिड वॉर्नरला मोहम्मद सिराजने 1 धावेवर बाद केले. वॉर्नर बाद झाल्यानंतर डुलकी काढत असलेल्या मार्नसला अचानक क्रीजवर धावत पळत जावे लागेल. डोळ्यात झोप घेऊन आलेल्या मार्नसला मोहम्मद सिराजने शॉर्ट बॉल टाकत त्याची झोप उडवली. त्यामुळे मार्नस बराच काळ चाचपडत खेळत राहिला.

चहापानापर्यंत मार्नस यातून सावरला नव्हता. चहापानानंतर मार्नसला साथ देणारा उस्मान ख्वाजा देखील 13 धावा करून बाद झाला. यामुळे आता मार्नसला जागे होणे क्रमप्राप्त होते. त्याने स्मिथसोबत तिसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचण्यास सुरूवात केली. या दोघांनी भागीदारी रचण्यास सुरूवात करत ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 29 षटकात 2 बाद 86 धावांपर्यंत पोहचवले.

(Sports Latest News)