मुंबई : मेरी कोमने सातव्या जागतिक विजेतेपदाची मोहीम जोमाने सुरू करताना जागतिक महिला मुष्टियुद्ध स्पर्धेतील 51 किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दरम्यान, रशियात सुरू असलेल्या या स्पर्धेत सविती बुरा हिचे आव्हान आटोपले आहे.
मेरीने यापूर्वी सहा वेळा जागतिक विजेतेपद जिंकले असले, तरी ती पहिल्यांदाच 51 किलो गटात जागतिक विजेतेपद जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. तिने थायलंडच्या जुतामास जितपॉंग हिच्याविरुद्धची लढत जिंकली. मेरीने ही लढत 5-0 जिंकल्याचा कौल देण्यात आला. फ्लायवेट गटातील या लढतीच्या वेळी पाच पंचांनी मेरीच्या बाजूने 29-28, 29-28, 29-26, 30-27, 30-27 असा कौल दिला होता.
तिसऱ्या मानांकित मेरीला पहिल्या फेरीत बाय होता. तिने या लढतीतील तीन मिनिटांच्या पहिल्या फेरीत प्रतिस्पर्धीचा अभ्यास केला. त्यानंतर लढतीची सूत्रे हाती घेतली. आक्रमणापेक्षा तिचे प्रतिआक्रमण तसेच बचाव जास्त सरस होता. मेरीची प्रतिस्पर्धी जुतामास सुरुवातीपासून आक्रमक होती, पण तिला अपेक्षित यश आले नाही. दुसऱ्या फेरीच्या उत्तरार्धास जुतामास थकली असल्याचे मेरीने जाणले आणि तिने आक्रमणाचा वेग वाढवला. मेरीने यावेळी तिचा अनुभव पणास लावला होता.
सविती ब्रिटनच्या लॉरेन प्राईसविरुद्ध 1-3 अशी पराभूत झाली. सवितीने सुरुवातीस चांगली लढत दिली होती; पण हा जोष राखण्यात तिला 75 किलो गटाच्या लढतीत अपयश आले. सविती या स्पर्धेत आव्हान आटोपलेली पाचवी भारतीय. यापूर्वी नीरज (57 किलो), सरिता देवी (60 किलो), मंजू बोम्बोरिया (64 किलो) आणि नंदिनी (81 किलोपेक्षा जास्त) यांचे आव्हान आटोपले आहे.
|