मेरी कोम म्हणते, निखत फक्त आव्हानच देते

वृत्तसंस्था
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

मी काही निखत झरीनविरुद्ध लढायला घाबरत नाही, असे प्रत्युत्तर देत मेरी कोमने ऑलिंपिक पात्रता स्पर्धेपूर्वीच्या चाचणी लढतीवरून सुरू असलेल्या वादंगास नवे वळण दिले. त्याचवेळी अभिनव बिंद्राला बॉक्‍सिंगमधील काय कळते, अशी संतप्त विचारणाही केली.

नवी दिल्ली : मी काही निखत झरीनविरुद्ध लढायला घाबरत नाही, असे प्रत्युत्तर देत मेरी कोमने ऑलिंपिक पात्रता स्पर्धेपूर्वीच्या चाचणी लढतीवरून सुरू असलेल्या वादंगास नवे वळण दिले. त्याचवेळी अभिनव बिंद्राला बॉक्‍सिंगमधील काय कळते, अशी संतप्त विचारणाही केली.

मेरीने जागतिक स्पर्धेत ब्रॉंझ जिंकले होते. मात्र जागतिक स्पर्धेसाठी मेरीच्या गटात चाचणी स्पर्धा झाली नव्हती, त्यामुळे आता आपणास संधी द्यावी, अशी मागणी निखत झरीन करीत आहे. तिने याबाबत केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांना हस्तक्षेप करण्याचीही विनंती केली आहे. अखेर मेरीने या वादाबाबत आपले मत व्यक्त केले आहे.

जागतिक स्पर्धेतील पदक विजेत्यांची ऑलिंपिक पात्रता स्पर्धेसाठी थेट निवड करण्याचा निर्णय भारतीय बॉक्‍सिंग महासंघाने घेतला आहे. मी त्यांचा निर्णय बदलू शकत नाही. मी केवळ खेळू शकते. ते जो काही निर्णय घेतील तो मला मान्य आहे. मी काही निखतचा सामना करायला घाबरत नाही. चाचणी लढतीस माझा कोणताही विरोध नाही, असे मेरीने सांगितले.

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर मी निखतला अनेकदा हरवले आहे. पण त्यानंतरही ती मला सतत आव्हान देत असते. आता यात खरंच काय अर्थ आहे. आता आमच्यातील लढत ही केवळ औपचारिकताच असेल. ऑलिंपिकमध्ये पदक कोण जिंकू शकते, हे भारतीय बॉक्‍सिंगचे पदाधिकारीही जाणतात, असा जोरदार ठोसा मेरीने दिला.

मेरी कोमचा मी आदर करतो, पण कोणत्याही खेळाडूला आपण सरस असल्याचे सिद्ध करावे लागते. आपण पूर्वीइतकेच सरस आहोत हे दाखवून द्यावे लागते. आपण कालच्यापेक्षा उद्या जास्त सर्वोत्तम ठरू शकतो हे दाखवून द्यावे लागते. खेळात काल काय घडले याला कधीच महत्त्व नसते.
- अभिनव बिंद्रा, ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता.

बिंद्रा ऑलिंपिक विजेता आहे, पण मीसुद्धा जागतिक स्पर्धेत अनेक सुवर्णपदके जिंकली आहेत. मी शूटिंगबाबत कधीही बोलत नाही. त्याने बॉक्‍सिंगमध्ये पडू नये.
त्याला बॉक्‍सिंगचे नियमही माहिती नसतील. त्याने गप्प बसणेच चांगले. मला नाही वाटत प्रत्येक स्पर्धेपूर्वी अभिनवने निवड चाचणी स्पर्धा दिली असेल.
- मेरी कोम

अनेक जण माझ्यावर जळतात
अनेक जण माझ्यावर जळतात, हे यापूर्वीही घडले आहे. रिंगमध्ये सरस कामगिरी करून दाखवा. भारतीय बॉक्‍सिंग महासंघ आम्हाला अनेक स्पर्धांसाठी पाठवतो. त्यात सुवर्णपदक जिंकून दाखवावे, असे आव्हान मेरी कोमने निखत झरीनला दिले. मी काही निखतविरुद्ध नाही. तिचे भविष्य उज्ज्वल असू शकेल. तिला अनुभव मिळू दे, आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या पूर्वतयारीवर सध्या तिने लक्ष केंद्रीत करणे योग्य होईल. मी वीस वर्षे लढत आहे. कोणाला आव्हान देणे सोपे असते, पण जिंकणे अवघड असते.

पुरुष महिलांबाबत भिन्न नियम का?
जागतिक स्पर्धेतील पुरुष पदक विजेत्यांना ऑलिंपिक पात्रता स्पर्धेसाठी चाचणी द्यावी लागणार नाही, असे महासंघाने जाहीर केले आहे, पण महिलांच्या स्पर्धेसाठी ही सूट केवळ सुवर्ण आणि रौप्य विजेत्यांना असेल, असे महासंघाने सांगितले आहे. पुरुष आणि महिला खेळाडूंसाठी भिन्न नियम कसे, अशी विचारणा मेरीने केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mary kom targets nikhat zarin