सुटीचा वेळ हुशारीने घालवा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मे 2019

परीक्षा संपून धमाल सुटी सुरू झाली आहे. या सुटीत काय काय करा, याच्या टिप्स बालमित्रांना दिल्या आहेत खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने... 

माझ्या मित्र - मैत्रिणींनो,  उन्हाळ्याची सुटी म्हणजे सर्व मुला-मुलींकरिता सर्वांत आनंदाचा काळ असतो. खरं सांगतो, मी पण त्याला अपवाद नव्हतो. शेवटचा पेपर देऊन परीक्षा हॉल बाहेर पडताना एक वेगळीच मजा असते. मी लहान होतो तेव्हा परीक्षेचा शेवटचा पेपर झाला, की दप्तर खोलीच्या कोपऱ्यात टाकायचो ते दोन महिने न शिवण्याकरिता! शाळेचा गणवेश अंगात तसाच ठेवून मी साहित्य सहवासच्या माझ्या मित्रांबरोबर खेळायला पळत सुटायचो. मे महिन्यात क्रिकेट, बॅडमिंटन, लपाछपीसह तमाम खेळ खेळायचे. वडापाववर ताव मारायचा. तहान लागली की लिंबू सरबत प्यायचे आणि संधी मिळताक्षणी कधीही आंबे खायचे. इतका सरळ साधा "प्लॅन' असायचा. 

उन्हाळ्याच्या सुट्या चालू आहेत आणि तुमच्या हाताशी भरपूर वेळ आहे. तो वाया घालवू नका. त्याचा सदुपयोग करा. तुमच्या आवडी-निवडींचा शोध घ्यायला त्याचा वापर करा. तुमच्या भोवतालच्या जगाविषयी जाणून घ्यायचा प्रयत्न करा. सुटीत खेळताना, मजा करताना जर व्यक्तिमत्त्वाचा विकास करता आला तर त्यासारखी चांगली गोष्ट दुसरी कोणतीही नसेल. आता जे तुम्ही छंद म्हणून जोपासाल, कदाचित पुढे जाऊन त्याचा वापर करून मोठेपणी तुम्ही तुमचे जग निर्माण करू शकाल. क्रिकेट खेळायच्या माझ्या छंदाचे रूपांतर नाही का झाले खेळाडू बनण्यात! अगदी तसेच तुमच्या बाबतीतही होऊ शकते. मी नुसता खेळत बसलो नाही, तर योग्य सुनियोजित मेहनत करून भारताचे प्रतिनिधित्व केले... विश्‍वविजेतेपदाचे स्वप्न साकारले गेले. या अनोख्या प्रवासाची सुरवात सोसायटीत मित्रांसोबत क्रिकेट खेळण्याने झाली, हे मी कसा विसरेन? 

बघा, मी प्रयत्न करतो, तुम्ही तुमच्या उन्हाळ्याच्या सुटीचा काळ चांगला कसा घालवता येईल याचे मुद्दे मांडून. यात कोणतीही जादू नाहीये. तुम्ही मोठ्या प्रमाणात तुमच्या आवडीच्या छंदांचे वर्गीकरण करा. उदाहणार्थ, कला, क्रीडा, प्रवास, नाटक, नृत्य, चित्रकला; अगदी काहीही. फक्त एकाच गोष्टीचा विचार करू नका. सगळे करून बघा. म्हणजे मग तुम्हाला नक्की समजेल की तुम्हांला रुची कशात आहे. असे मजेदार छंद जोपासत गेलात, की तुमच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पडतील आणि तुम्हाला खूप आनंद व समाधानही लाभेल. 

मला गाण्याचे ज्ञान नाही. पण बरीच वर्षे मी गाणी ऐकायचा छंद मनापासून जोपासला आहे. मूडप्रमाणे मी गाणी ऐकतो. विविध प्रकारची गाणी ऐकतो. मराठी, हिंदी अगदी इंग्लिशही. कोणत्याही कलेची जोपासना उपासना करत गेलात, तर तुमच्या मेंदूची उजवी बाजू तल्लख होत जाते. हे छंदच तुम्हाला चांगला माणूस बनायला मदत करतात. 

प्रवास करायचा निरनिराळ्या जागांना भेट दिल्याने धमाल येते, तसेच ज्ञानात भर पडते. जगाकडे बघायचा दृष्टिकोन व्यापक होतो. त्या त्या ठिकाणच्या चालीरीती, कला यांची माहिती रंजकतेने समजते. नवीन खाद्य पदार्थ चाखायला मिळतात. प्रवास करणे म्हणजे गाव किंवा देश सोडून बाहेर जाणे असेच नाहीये. अगदी तुमच्या गावातही मजेदार ठिकाणे असतात; आपण फक्त त्याचा शोध घ्यायचा असतो. सुटीनंतर शाळा चालू झाली की मग तेच अनुभव मित्रांसोबत शेअर करायला मजा येते. एकमेकांच्या कहाण्या ऐकताना हरखून जायला होते. 

शेवटचा विषय अर्थातच माझा आवडता खेळाचा आहे. मी परत एकदा सांगतो, की कोणताही छंद चांगलाच असतो. पण खेळाला एक वेगळी किनार असते. खेळत असताना तुमचा सहभाग नुसता शारीरिक नव्हे, तर मानसिक आणि भावनिक असतो. खेळातून तुम्ही काय शिकता एकदा बघूयात. जीव ओतून कोणतीही गोष्ट करणे खेळ शिकवतो. नेतृत्व कला खेळातून पुढे येते. सांघिक भावना खेळातून आपोआप घडत जाते. सर्वांत मोलाच्या दोन गोष्टी खेळ देते, ते म्हणजे यश- अपयश पचवण्याची ताकद आणि दुसऱ्याच्या यशात आनंद घेण्याचा मनाचा मोठेपणा. 

तुम्ही कोणताही खेळ निवडा तुमच्या आवडीचा आणि तो खेळण्यात उन्हाळ्याच्या सुटीत तासन्‌तास घालवा. त्या खेळाची खरी गोडी लागली, तर त्याचे प्रशिक्षण घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. साहित्य सहवास सोसायटीत मित्रांसोबत क्रिकेट खेळताना मला खरी गोडी लागली. मला जिवाभावाचे मित्र आणि कधीही न विसरता येणाऱ्या आठवणींचा साठा मिळाला, जो खऱ्या अर्थाने अमूल्य आहे. इतकेच सांगतो उन्हाळ्याच्या सुटीत जोमाने खेळ खेळलात, की महान खेळाडू बनला नाहीत तरी तुम्ही छान माणूस बनाल. 

सरते शेवटी इतकेच सांगेन, की उन्हाळ्याच्या सुटीचा सदुपयोग करा... खूप दंगा करा... खूप धमाल करा... तुमची दृष्टी बदला... मस्त तंदुरुस्त राहा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मजा लुटा! इतका मोठा झालो तरी अजूनही संधी मिळाली की मी तेच करतो. साहित्य सहवासच्या आणि शाळेतील बाल मित्रांना जमा करून आम्ही अजूनही धमाल करतो. 

तुमचा, 
सचिन तेंडुलकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Master Blaster Sachin Tendulkar has given tips to Balmitra