मौसम खत्री, पवनकुमार आशियाई स्पर्धेसाठी पात्र

वृत्तसंस्था
रविवार, 10 जून 2018

​आशियाई स्पर्धेसाठी पात्र ठरलेले मल्ल ः फ्री-स्टाइल ः पवन कुमार (86 किलो), मौसम खत्री (97 किलो), सुमीत (125 किलो), बजरंग पुनिया (61 किलो), सुशील कुमार (74 किलो) 
ग्रीको रोमन ः ग्यानेंद्र (60 किलो), मनीष (67 किलो), गुरप्रीत सिंग (77 किलो), हरप्रीत सिंग (87 किलो), हरदीप (97 किलो), नवीन (125 किलो) 

 

नवी दिल्ली - आशियाई क्रीडा स्पर्धेतील माजी ब्रॉंझपदक विजेता मौसम खत्री आणि पवन कुमार हे या वर्षी होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघासाठी पात्र ठरले. निवड चाचणीतील 57 किलो वजनी गटातील निर्णय आता बुधवारी (ता. 13) होणार आहे. 

भारतीय संघ निवड चाचणीसाठी शनिवारी सोनीपत येथे निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे सुशील कुमार आणि बजरंग पुनीया यांना यापूर्वीच्या कामगिरीच्या जोरावर थेट संघात प्रवेश देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता. 

2010च्या स्पर्धेत ब्रॉंझपदक मिळविणाऱ्या मौसम खत्रीने पात्रता सिद्ध करताना साक्षी मलिकचा नवरा सत्यव्रत काडियन याचा पराभव केला. दरम्यान, महिला संघ निवडीसाठी उद्या लखनौ येथे निवड चाचणी होणार आहे. 

घोळ 57 किलोचा 
निवड चाचणीत 57 किलो वजनी गटाचा घोळ कायम राहिला. या गटातून राष्ट्रकुल सुवर्ण विजेता असल्याने राहुल आवारेने आपल्यालाही थेट प्रवेश देण्याची मागणी केली होती. मात्र, महासंघाने ती फेटाळली. राहुल निवड चाचणी देणार नाही हे यापूर्वीच माहीत असल्यामुळे महाराष्ट्राने उत्कर्ष काळेचे नाव पाठवले. त्याने एक लढत जिंकली. आव्हानवीर संदीप तोमरकडून तो हरला. पण, त्याने रवी कुमारवर विजय मिळविला. पुढे रवीने संदीप तोमरला हरवले. या वजनी गटातील निकाल न लागल्यामुळे आता या वजनी गटाचा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. आता चाचणी देणाऱ्या मल्लांमध्येच बुधवारी (ता. 13) पुन्हा निवड चाचणी होईल, असे कुस्तीगीर महासंघाचे सचिव विनोद तोमर यांनी सांगितले. 

आशियाई स्पर्धेसाठी पात्र ठरलेले मल्ल ः फ्री-स्टाइल ः पवन कुमार (86 किलो), मौसम खत्री (97 किलो), सुमीत (125 किलो), बजरंग पुनिया (61 किलो), सुशील कुमार (74 किलो) 
ग्रीको रोमन ः ग्यानेंद्र (60 किलो), मनीष (67 किलो), गुरप्रीत सिंग (77 किलो), हरप्रीत सिंग (87 किलो), हरदीप (97 किलो), नवीन (125 किलो) 

 

Web Title: mausam Khatri, Pawan Kumar are eligible for Asian Games