मॅक्स पर्सेलला जेतेपदाचा मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

max purcell

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या पीएमआर ओपन एटीपी चॅलेंजर पुरुष गट टेनिस स्पर्धेच्या एकेरीचे विजेतेपद ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या मानांकित मॅक्स पर्सेलने पटकाविले.

Max Purcell : मॅक्स पर्सेलला जेतेपदाचा मान

पुणे - महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या पीएमआर ओपन एटीपी चॅलेंजर पुरुष गट टेनिस स्पर्धेच्या एकेरीचे विजेतेपद ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या मानांकित मॅक्स पर्सेलने पटकाविले.

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीच्या संकुलात टेनिस कोर्टवर रविवारी संपलेल्या या स्पर्धेत एकेरीच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या तिसरे मानांकन असलेल्या मॅक्स पर्सेलने एक तास अठरा मिनिटांच्या खेळानंतर इटलीच्या चौथ्या मानांकित लुका नार्डीवर ६-२, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करून जेतेपद मिळविले. या सामन्यात मॅक्सने पहिल्या सेटमध्ये पाचव्या व सातव्या गेममध्ये लुकाची सर्व्हिस ब्रेक करत पहिला सेट ६-२ असा सहज जिंकला.

आपल्या खेळात सातत्य राखीत मॅक्सने दुसऱ्या सेटमध्येही पाचव्या व नवव्या गेममध्ये लुकाची सर्व्हिस ब्रेक करत दुसरा सेटही ६-३ असा जिंकत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. विजेत्या मॅक्स पर्सेलने भारतात चेन्नई, बेंगळुरू नंतर पुण्यात असे सलग तिसरे विजेतेपद पटकावण्याचा विक्रम केला आहे. एटीपी चॅलेंजर मध्ये सलग तीन विजेतेपद पटकाविताना मॅक्स जागतिक क्रमवारीत ९५ व्या स्थानावर पोहोचला आहे. मॅक्सने चेन्नईमध्ये अमेरिकेच्या निकोलस मोरेनो डी अल्बोरानचा तर बेंगलुरू येथे जागतिक ऑस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थला पराभूत केले होते. काल उपांत्य फेरीत इटलीच्या लुका नार्डीने चेक प्रजासत्ताकच्या डॉमनिक पालनचा ७-६(४), १-६, ७-५ असा तर ऑस्ट्रेलियाच्या मॅक्स पर्सेलने सर्बियाच्या मिलजान झेकिकचा ६-२, ६-३ असा पराभव केला होता.

या स्पर्धेतील विजेत्या मॅक्स पर्सेलला करंडक, १७,६५० डॉलर व १०० एटीपी गुण तर उपविजेत्या लुका नार्डीला करंडक, १०,३८० डॉलर व ६० एटीपी गुण अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण पीएमआरडीए कमिशनर राहुल रंजन महीवाल यांच्या हस्ते झाला. यावेळी एमएसएलटीएचे चेअरमन प्रशांत सुतार सहसचिव राजीव देसाई, सचिव आणि स्पर्धा संचालक सुंदर अय्यर, शीतल भोसले, एटीपी सुपरवायझर आंद्रेई कॉर्निलोव्ह हे उपस्थित होते.

निकाल -

अंतिम फेरी : एकेरी गट : मॅक्स पर्सेल (ऑस्ट्रेलिया) वि.वि. लुका नार्डी (इटली) ६-२, ६-३.

टॅग्स :Competitionwinnertennis