क्रिकेटमध्येही आता येणार "रेड कार्ड'

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

पंचांचा आदर ठेवावयासच हवा. ऑस्ट्रेलियन नियमांप्रमाणे खेळला जात असलेल्या फुटबॉल सोडला; तर सामना सुरु असतानाच खेळाडूस रोखण्याची सुविधा नसलेला क्रिकेट हा एकमेव खेळ आहे. चुरशीने मात्र सभ्यपणे खेळण्याची प्रवृत्ती हाच क्रिकेटचा आत्मा आहे

मुंबई - क्रिकेटमधील वाढत्या हिंसक घटना रोखण्याकरिता स्थानिक क्‍लब स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरांवरील सर्व सामन्यांमध्ये लवकरच "रेड कार्ड' आणले जाणार असल्याचे वृत्त आहे. पंचांना, प्रेक्षकांना वा खेळाडूंना धमकाविणे, इजा करणे यांसारख्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या खेळाडूस लाल कार्ड दाखवून थेट मैदानाबाहेर पाठविण्याचा अधिकार पंचांस हवा, अशा आशयाची शिफारस मेरिलीबोन क्रिकेट समितीने (एमसीसी) केली आहे.

हा नियम येत्या ऑक्‍टोबर महिन्यापासून अंमलात आणला जाण्याची शक्‍यता आहे. या महिन्यात एमसीसीकडून क्रिकेटच्या नियमांचा फेरआढावा घेण्यात येणार आहे. सध्या स्थानिक स्तरावरील क्रिकेटमध्येच अशा स्वरुपाच्या घटना पहावयास मिळाल्या आहेत. मात्र यासंदर्भातील नियमांची अंमलबजावणी आंतरराष्ट्रीय स्तरावरही केली जाणार आहे. इंग्लंडमधील क्‍लब स्तरावर अशा स्वरुपाच्या अनेक घटना घडल्याचे आढळून आले आहे.

लाल कार्डांसहित "पिवळे कार्ड व सिन बिन'ची अंमलबजावणी करण्याचा प्रस्तावही एमसीसीसमोर मांडण्यात आला होता. परंतु, या प्रस्तावांची सातत्यपूर्ण अंमलबजावणी कठीण असल्याचा मतप्रवाह असल्याचे दिसून आले.

"क्रिकेटच्या नियमांमधील हा अत्यंत महत्त्वपूर्ण बदल आहे. इंग्लंडमधील क्‍लब स्तरावरील सामन्यांमधील खेळाडूंचे वर्तन आक्षेपार्ह असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. पंचांचा आदर ठेवावयासच हवा. ऑस्ट्रेलियन नियमांप्रमाणे खेळला जात असलेल्या फुटबॉल सोडला; तर सामना सुरु असतानाच खेळाडूस रोखण्याची सुविधा नसलेला क्रिकेट हा एकमेव खेळ आहे. चुरशीने मात्र सभ्यपणे खेळण्याची प्रवृत्ती हाच क्रिकेटचा आत्मा आहे,'' असे एमसीसीच्या जागतिक क्रिकेट समितीचे अध्यक्ष असलेल्या माईक ब्रेरली यांनी सांगितले.

Web Title: MCC to introduce red cards in cricket