युवा खेळाडूंची पदके जास्त मोलाची- राठोड 

वृत्तसंस्था
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या पदकविजेत्या खेळाडूंमध्ये 31 पदकविजेते 21 वर्षांचे किंवा त्यापेक्षा कमी वयाचे आहेत, हे महत्त्वाचे असल्याचे केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांनी सांगितले.

नवी दिल्ली- आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या पदकविजेत्या खेळाडूंमध्ये 31 पदकविजेते 21 वर्षांचे किंवा त्यापेक्षा कमी वयाचे आहेत, हे महत्त्वाचे असल्याचे केंद्रीय क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांनी सांगितले. 

योग्य दृष्टिकोन तसेच खेळातील स्पर्धेची व्याप्ती लक्षात घेणे हा यशाच्या मार्गावरील पहिला टप्पा असतो. मी हे अनुभवले आहे. खेळाडूंना प्रगतीसाठी पोषक वातावरण निर्माण करणे, हे माझे क्रीडामंत्री म्हणून काम आहे. देशाची शान उंचावण्यासाठी आम्ही कधीही हार मानणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 

भारताच्या नवोदित क्रीडापटूंची कामगिरी मोलाची आहे. त्यांच्यावर स्पर्धेचे दडपण नव्हते. जबाबदारीची त्यांना जाणीव होती. 16 वर्षीय मुलाने नेमबाजीत सुवर्णपदक जिंकणे हे नक्कीच मोलाचे आहे. आपल्या लक्ष्याची पुरेपूर जाणीव असलेले हे युवक आहेत. त्यांनी ही पदके नव्याने स्पर्धेत दाखल झालेल्या खेळात जिंकली आहेत, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, एक तर पदक जिंकण्याची संधी असलेल्या खेळाडूंवर लक्ष केंद्रित करा किंवा खेळातील सहभाग वाढवा, असे सांगितले जाते. माझ्या मते या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. त्याच कारणास्तव खेलो इंडियासाठीचा निधी वाढवला आहे. 

क्रीडामंत्र्यांनी मार्गदर्शकांच्या कामगिरीचाही आढावा घेत असल्याचे सांगितले. त्यासाठी मार्गदर्शकांच्या प्रशिक्षणाचीही योजना तयार करीत आहोत. विविध स्तरांवर मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शकांत एकवाक्‍यता आवश्‍यक आहे. हे ट्रेनिंग मैदानावरील खेळाडूस पदकविजेता घडवण्यापर्यंतचे असेल, असेही त्यानी सांगितले. 

आपण यश साजरे करायला हवे. पंतप्रधानांनी कामगिरीचा आढावा घेताना कोणी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली याची विचारणा केली होती. केवळ पदकच नव्हे, तर कामगिरी कशी होते हेही महत्त्वाचे आहे. सर्वोत्तम कामगिरीचेही आम्ही कौतुक करीत आहोत. कसलीही भीती बाळगू नका, हा दृष्टिकोन असल्याचा खूपच दूरगामी परिणाम झाला आहे. - राजवर्धन राठोड, क्रीडामंत्री 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medal of young players is much more important says Rathod