मेस्सी बहरला; बार्सिलोनाचा धडाका

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

मेस्सीने गोल कसा करावा, हे दाखवीत बार्सिलोनाचे खाते झटपट उघडले. त्यांचा गोलधडाका सुरू होण्याच्या सुमारास त्यांना गोल स्वीकारावा लागला; पण बार्सिलोनाने वेळीच खेळ उंचावत विजय सुकर केला. एकतर्फी विजयास साजेसाच आमचा खेळ झाला, असे बार्सिलोनाचे मार्गदर्शक लुईस एन्रीक यांनी सांगितले.

बार्सिलोना - लिओनेल मेस्सीने ला लीगा स्पॅनिश साखळीतील धडाका कायम ठेवत दोन गोल केले. त्यामुळे बार्सिलोनाने ओसासुनाचा 7-1 धुव्वा उडवला, त्याच वेळी त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी रेयाल माद्रिदने विजेतेपदाची शर्यत कायम ठेवताना ला कोरुनाचा 6-2 असा पाडाव केला.

लिओनेल मेस्सी, आंद्रे गोम्स, पॅको ऍल्कासेर यांनी प्रत्येकी दोन; तर जेव्हीयर मॅशेरानो याने एक गोल करीत बार्सिलोनाचा विजय सुकर केला. बार्सिलोनाविरुद्ध पराजित झालेल्या संघात रेयालने नऊ बदल केले; पण त्यांच्या राखीव खेळाडूंनी गोलधडाका कायम ठेवला. आता बार्सिलोना, तसेच रेयालचे प्रत्येकी 78 गुण आहेत; पण रेयाल (33) बार्सिलोनापेक्षा (34) एक सामना कमी खेळले आहेत.

मेस्सीने गोल कसा करावा, हे दाखवीत बार्सिलोनाचे खाते झटपट उघडले. त्यांचा गोलधडाका सुरू होण्याच्या सुमारास त्यांना गोल स्वीकारावा लागला; पण बार्सिलोनाने वेळीच खेळ उंचावत विजय सुकर केला. एकतर्फी विजयास साजेसाच आमचा खेळ झाला, असे बार्सिलोनाचे मार्गदर्शक लुईस एन्रीक यांनी सांगितले.

टॉटनहॅमचे दडपण कायम
लंडन - टॉटनहॅम हॉटस्परने क्रिस्टल पॅलेसला 1-0 असे हरवून चेल्सीवरील दडपण कायम ठेवले. चेल्सीने साऊदम्प्टनला पराजित करून आपली आघाडी सात गुणांची केली होती; पण ती आता पुन्हा चार गुणांची झाली. ख्रिस्तियन एरिकसनने टॉटनहॅमचा विजयी गोल केला. आर्सेनलने लिस्टर सिटीला 1-0 हरवून चॅम्पियन्स लीगच्या आशा कायम ठेवल्या. या पराभवामुळे लिस्टर सिटी प्रीमियर लीगमधून बाद होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Web Title: Messi leads Barcelona to 7-1 victory; Real Madrid wins 6-2