Mohammad Rizwan : रिझवानचं शतक हुकलं मात्र केला मोठा विक्रम, बटलरलाही टाकलं मागं | Cricket News In Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohammad Rizwan T20I cricket

Mohammad Rizwan : रिझवानचं शतक हुकलं मात्र केला मोठा विक्रम, बटलरलाही टाकलं मागं

Mohammad Rizwan T20I cricket : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील 5 वा टी 20 सामना नुकताच झाला. या सामन्यात पाकिस्तानचा धडाकेबाज फलंदाज मोहम्मद रिझवानने 98 धावांची खेळी केली. त्याचे शतक अवघ्या 2 धावांनी हुकले. मात्र या खेळीमुळे रिझवानने एक मोठा विक्रम आपल्या नावार केला. त्याने इंग्लंडचा वर्ल्डकप विजेता कर्णधार जॉस बटलरला देखील मागे टाकण्याचा कारनामा केला आहे.

मोहम्मद रिझवान आता आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा यष्टीरक्षक फलंदाज झाला आहे. त्याने या बाबतीत इंग्लंडच्या जॉस बटलरला देखील मागे टाकले. बटलरने यष्टीरक्षक फलंदाज म्हणून टी 20 मध्ये 86 सामन्यात 2605 धावा केल्या आहेत. मोहम्मद रिझवानने न्यूझीलंडविरूद्धच्या पाचव्या टी 20 सामन्यात 98 धावांची खेळी केली. यामुळे टी 20 क्रिकेटमध्ये आता त्याच्या 69 सामन्यात 2656 धावा झाल्या आहेत. रिझवानने टी 20 मध्ये 25 अर्धशतके ठोकली आहेत. रिझवानच्या नावावर टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एक शतक देखील आहे.

दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डिकॉकने टी 20 मध्ये 2264 धावा केल्या आहेत. तर अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहजादने 1997 धावा केल्या आहेत तर भारताच्या महेंद्रसिंह धोनीच्या नावावर 1617 धावा आहेत.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 5 बाद 193 धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडच्या संघाने 19.2 षटकात 4 विकेट्सच्या मोबदल्यात 194 धावा करत सामना 6 विकेट्सनी जिंकला. न्यूझीलंडकडून मार्क चॅपमॅनने 57 चेंडूत 104 धावांची धडाकेबाज खेळी केली. न्यूझीलंडने पाकिस्तानविरूद्धची 5 सामन्यांची टी 20 मालिका 2 - 2 अशी बरोबरीत सोडवली.

(Sports Latest News)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार