World Cup 2019 : शमीची तंदुरुस्ती ही मोठी उपलब्धी; तंदुरुस्ती प्रशिक्षक 

World Cup 2019 : शमीची तंदुरुस्ती ही मोठी उपलब्धी; तंदुरुस्ती प्रशिक्षक 

वर्ल्ड कप 2019 : साऊदम्प्टन : भारतीय क्रिकेट संघ सध्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत खेळाडूंच्या तंदुरुस्तीच्या प्रश्‍नांचा सामना करत आहे. अशा वेळी भारतीय संघाचे तंदुरुस्ती प्रशिक्षक शंकर बसू यांनी वेगवान गोलंदाज महंमद शमी याला तंदुरुस्त राखले ही आपली मोठी उपलब्धी असल्याचे म्हटले आहे. 

भारतीय संघाचे तंदुरुस्ती प्रशिक्षक म्हणून 50 वर्षीय शंकर बसू 2015 पासून संघासोबत आहेत. संघासोबत असल्यापासून महंमद शमी आणि केदार जाधव त्यांच्या तंदुरुस्ती शिबिरात पूर्ण योगदान देऊ शकले नव्हते. पण, त्यांना अशाही परिस्थितीत तंदुरुस्त ठेवले हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. संघातील खेळाडूंच्या तंदुरुस्ती कार्यक्रमाविषयी त्यांनी माहिती दिली. 

कोहली जागरूक खेळाडू 
तंदुरुस्तीबाबत कर्णधार विराट कोहली खूप जागरूक आहे. त्याला स्वतःच्या शरीररचनेची चांगली ओळख आहे. एकही दिवस त्याचा वर्क आऊट चुकत नाही. जेव्हा तंदुरुस्तीबाबत प्रशिक्षण सुरू असते, तेव्हा सातत्याने तो प्रश्‍न उपस्थित करत असतो. जोपर्यंत उत्तराने त्याचे समाधान होत नाही, तोवर तो प्रश्‍न विचारतच राहतो. उत्तर मिळाले की तो त्याचा पाठपुरावा करतो. तंदुरुस्तीबाबत तो कमालीचा आग्रही आहे. 

शमीचे आयुष्यच बदलले 
तंदुरुस्तीसाठी झगडणारा शमी गेल्या मोसमात प्रत्येक कसोटी सामना खेळला. गेल्यावर्षी तो तंदुरुस्ती चाचणीत अपयशी ठरला होता. वैयक्तिक आयुष्यातही काही अडचणींचा सामना त्याला करावा लागत होता. ज्या वेळेस तो पुन्हा परतला तेव्हा त्याला आता 20 दिवस सलग प्रशिक्षण घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. त्याने क्षणाचाही विचार न करता होकार दिला आणि तेव्हापासून तो "अनफिट' राहिलेला नाही. तंदुरुस्तीसाठी "वर्क आऊट' त्याच्यासाठी नित्याचे झाले आहे. कसोटी सामन्यात त्याचा चेंडू टाकण्याचा वेग सुरवातीपासून अखेरपर्यंत कायम राहिला होता. 

बुमराही सुधारला 
आपण संघासोबत आलो तेव्हा जसप्रित बुमरादेखील फारसा तंदुरुस्त नसायचा. पण, त्याच्यातही कमालीचा फरक पडला आहे. मी संघासोबत आलो तेव्हाचा आणि आताचा बुमरा यात जमीन आस्मानाचा फरक पडला आहे. तेव्हाचा सतत तक्रारी करणारा बुमरा आता कठोर मेहनतीने संघातील एक तंदुरुस्त खेळाडू म्हणून ओळखला जातोय. एक्‍सरसाईज, योग्य आहार आणि झोपण्याची योग्य पद्धत अवलंबल्यामुळे त्याच्यात हा फरक पडला आहे. 

प्रशिक्षकांची साथ 
गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांची साथ मिळाली. खेळाडूंचे वर्क-आऊट झाल्यावर भरतला गोलंदाजांकडून इतकाच वेळ गोलंदाजी करून घे किंवा संजयला फलंदाजांकडून इतकाच वेळ फलंदाजी करून घे असे सांगितले, तर त्यांनीदेखील ते मान्य केले. त्यामुळे सरावातही खेळाडूंवर ताण येत नाही. 

कोण काय करते 
- विराट कोहली-दिनेश कार्तिक : वेटलिफ्टिंगवर भर 
- बुमरा-राहुल : उड्या मारण्याचा अधिक सराव. त्यामुळे ताकद आणि वेग वाढतो 
- विजय शंकर : दक्षिणेकडील असल्याने त्याच्या आहारात भात असतोच. त्यावर बंधन घातले नाही. पण, वर्क-आऊटमध्ये कुचराई नाही 
- महेंद्रसिंह धोनी : स्वतःच्या शरीररचेनी योग्य ओळख. शरीरातील राखीव क्षमतेचा अचूक वापर 

आधुनिक क्रिकेटला अनुसरून मी तंदुरुस्ती प्रशिक्षणचा वेगवेगळ्या पद्धती वापरल्या. यात नियमित जिम्नॅशियम टाळले. वेग आणि ताकद कशी वाढेल यावर भर दिला. त्यामुळे आता प्रत्येक जणास तंदुरुस्तीचे महत्त्व पटले आहे आणि ते तंदुरुस्त आयुष्य जगत आहेत. 
- शंकर बसू, भारताचे तंदुरुस्ती प्रशिक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com