
IND vs AUS : ख्वाजा - पीटर भिडला मात्र शमीने कांगारूंचा पहिला डाव पहिल्याच दिवशी संपवला
India Vs Australia 2nd Test Day 1 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 263 धावांवर संपुष्टात आला. भारतीय गोलंदाजांसमोर कांगारूंच्या फलंदाजांनी पहिल्याच दिवशी नांगी टाकली. मात्र याला उस्मान ख्वाजा आणि पीटर हँड्स्कम्ब अपवाद राहिले. सलामीवीर ख्वाजाने 81 तर पीटरने नाबाद 72 धावांची खेळी केली. भारताकडून मोहम्मद शमीने 4 तर रविंद्र जडेजा आणि अश्विनने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने सावध सुरूवात केली. 21 व्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरने आपले खाते उघडले. दरम्यान उस्मान ख्वाजाने ऑस्ट्रेलियाचा धावफलक हलता ठेवला होता. या दोघांनी ऑस्ट्रेलियाला अर्धशतकी सलामी दिली.
ही जोडी जमणार असे वाटत असतानाच मोहम्मद शमीने डेव्हिड वॉर्नरला 15 धावांवर बाद केले. त्यानंतर आलेल्या मार्नस लाबुशानेने आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूने उस्मान ख्वाजाने आपला गिअर बदलला होता. मात्र अश्विनने पुन्हा एकदा कांगारूंची कंबरडे मोडले.
त्याने मार्नसला 18 धावांवर बाद केले. पाठोपाठ स्टीव्ह स्मिथला देखील शुन्यावर बाद करत भारताला लंचपूर्वी अजून दोन विकेट्स मिळवून दिल्या. यामुळे कांगारूंची अवस्था 1 बाद 91 वरून 3 बाद 91 अशी झाली.
लंचनंतर ट्रॅव्हिस हेड आणि उस्मान ख्वाजा यांनी डाव सावरत भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र शमीने हेडला 12 धावांवर माघारी धाडले. त्यानंतर उस्मानने झुंजार खेळी करत कांगारूंना 150 च्या पार पोहचवले. मात्र रविंद्र जडेजाने उस्मान ख्वाजाला 81 धावांवर बाद करत कांगारूंना मोठा धक्का दिला. या विकेटमध्ये केएल राहुलने भन्नाट कॅच पकडत मोलाची भुमिका बजावली.
यानंतर अश्विनने कसोटीतील आपली 100 वी ऑस्ट्रेलियन शिकार केली. त्याने अॅलेक्स केरीला शुन्यावर बाद करत कांगारूंची अवस्था 6 बाद 168 धावा अशी केली. यानंतर पीटर हँडस्कॉम्ब आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी कांगारूंना टी टाईमपर्यंत 199 धावांपर्यंत पोहचवले.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि पीटर हँड्स्कॉम्ब यांनी सातव्या विकेटसाठी 59 धावांची झुंजार भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला द्विशतकी मजल मारून दिली. हँड्स्कॉम्बने झुंजार अर्धशतक केले तर त्याला 33 धावा करून कमिन्सने चांगली साथ दिली. अखेर जडेजाने कमिन्सला बाद करत ही जोडी फोडली.
यानंतर पीटरने तळातील फलंदाजांना हाताशी घेत ऑस्ट्रेलियाला 263 धावांपर्यंत पोहचवले. त्याने नाबाद 72 धावा केल्या. अखेर मोहम्मद शमीने मॅथ्यू कुहनमनला बाद करत कांगारूंचा पहिला डाव पहिल्याच दिवशी संपवला.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार