Mohammed Shami VIDEO : पाटा खेळपट्टीवरही शमीने दाखवला दम; काही समजण्याच्या आतच हँड्सकॉम्बची दांडी गुल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohammed Shami

Mohammed Shami VIDEO : पाटा खेळपट्टीवरही शमीने दाखवला दम; काही समजण्याच्या आतच हँड्सकॉम्बची दांडी गुल

Mohammed Shami IND vs AUS VIDEO : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा आणि निर्णाय कसोटी सामना आजपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू झाला. आज पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम पहिल्या दिवशी 4 बाद 255 धावा केल्या. उस्मान ख्वाजाने नाबाद 104 धावा ठोकत दिवसभर फलंदाजी केली. तर कॅमरून ग्रीन दिवसअखेर 49 धावा करून नाबाद राहिला.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाच्या तीनही सत्रात आपले वर्चस्व जरी प्रस्थापित केले असले तरी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला चार धक्के देखील दिले. यातील सर्वात सुंदर विकेट ही पीटर हँड्सकॉम्बची होती. अहमदाबादच्या पाटा खेळपट्टीवर मोहम्मद शमीने चांगला मारा करत हँड्सकॉम्बची दांडी गुल केली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पहिल्या दिवशी ट्रॅविस हेड आणि उस्मान ख्वाजा यांना 61 धावांची सलामी देत चांगली सुरूवात केली होती. मात्र हेडने आपली विकेट फेकली. त्यानंतर आलेल्या मार्नस लाबुशेनला देखील फारशी चमद दाखवता आली नाही. तो 3 धावांची भर घालून माघारी परतला. मार्नस बाद झाल्यानंतर आलेल्या स्टीव्ह स्मिथने उस्मान ख्वाजासोबत तिसऱ्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी रचली. मात्र रविंद्र जडेजाने स्मिथचा त्रिफळा उडवत ही जोडी फोडली.

स्मिथ बाद झाल्यानंतर पीटर हँड्सकॉम्ब क्रीजवर आला. त्याने 17 धावा करत जम बसवण्याचा प्रयत्न केला. त्याने या मालिकेत भारतीय फिरकीपटूंचा चांगला मुकाबला केला होता. मात्र 71 व्या षटकात मोहम्मद शमीने एका सुंदर चेंडूवर हँड्सकॉम्बची ऑफ स्टम्प उखडून टाकली. मोहम्मद शमीच्या या चेंडूची सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

दरम्यान, हँड्सकॉम्ब बाद झाल्यानंतर आलेल्या कॅमरून ग्रीनने आक्रमक फलंदाजी करत उस्मान ख्वाजासोबत पाचव्या विकेटसाठी नाबाद 85 धावांची भागीदारी रचली. उस्मान ख्वाजाने दिवसाच्या शेवटच्या षटकात आपले शतक पूर्ण केले. तर ग्रीन 49 धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेर 4 बाद 255 धावा केल्या.

(Sports Latest News)

हेही वाचा : डेट फंडातही आकर्षक परताव्याची संधी..पण गुंतवणूक करण्यापूर्वी हे वाचा...