'त्या' ट्विटमुळे रायुडू अजूनही संघाबाहेरच

सोमवार, 1 जुलै 2019

रायुडूने मात्र 3D गॉगल्सच्या ट्वीटनंतर काहीच केले नाही. उलट जसप्रीत बुमराचा यॉर्कर लागून विजय शंकर जायबंदी झाला तेव्हा रायुडूने त्याच्यावर चेटूक केल्याचे एक ट्विट झाले. ते विडंबन करणारे असले तरी त्यातून रायुडूची भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनातील प्रतिमा काय आहे हेच स्पष्ट झाले.

वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची निवड होण्यापूर्वी अंबाती रायुडू याचे स्थान नक्की मानले जात होते. प्रत्यक्षात विजय शंकर याच्या रुपाने 3D खेळाडूने त्याचा पत्ता कट केला. तेव्हा दुसरा यष्टिरक्षक म्हणून दिनेश कार्तिक-रिषभ पंत यांच्यात चुरस होती. चौथ्या क्रमांकासाठी शंकर आणि रायुडू असे दोन मोहरे शर्यतीत असल्याचे बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले.

प्रत्यक्षात विजय शंकरला संधी मिळणे अनपेक्षित होते. त्यानंतर अंबाती रायुडू याने एक ट्विट केले. त्यात त्याने वर्ल्ड कप पाहण्याठी 3D ग्लासेसचा नवा सेट ऑर्डर केल्याचे म्हटले होते. त्याने खिल्ली उडविणाऱ्या इमोजी सुद्धा पोस्ट केल्या होत्या. याद्वारे त्याने प्रसाद यांचा अवमान केला होता. राडुयूने हे ट्वीट आतापर्यंत डिलीट केलेले नाही. त्यावर हजारो लाईक्स आणि हजारो प्रतिक्रिया उमटल्या तरी त्यातून रायुडू हा हिरो नव्हे तर झिरो असल्याचेच स्पष्ट झाले.

सोशल मिडीयाला अशा ट्वीट हव्याच असतात. अर्थात ते ट्विट करून रायुडूने त्याच्याच पायावर धोंडा मारून घेतला होता. निवड समितीने मात्र त्याला बदली खेळाडू म्हणून निवडले. तो आणि रिषभ पंत असे दोन फलंदाज बदली खेळाडू होते. मग सलामीवीर शिखर धवन जायबंदी झाला. त्यावेळी पंतला पसंती मिळाली. पंत हा तरुण रक्ताचा असल्यामुळे त्याला प्राधान्य मिळाले असे म्हणूयात. नंतर साक्षात विजय शंकर जायबंदी झाला. त्यावेळी मात्र रायुडू, जो दुसऱ्या क्रमांकाचा बदली खेळाडू होता, त्याच्याऐवजी मयांक अगरवाल याला पाचारण करण्याचा निर्णय टिम इंडियाच्या थिंक टँकने घेतला.

यावरून रायुडूने बदली खेळाडू म्हणूनही आपले स्थान गमावल्याचे स्पष्ट होते. याप्रसंगी आपण पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज जुनैद खान याचे उदाहरण घेऊयात. तो तर मुळ स्पर्धेसाठी संघात होता. तो इंग्लंडमध्ये दाखल झाला होता. तो वर्ल्ड कपपूर्वी वन-डे मालिकेत सहभागी सुद्धा झाला होता. नंतर मात्र पाकिस्तानच्या निवड समितीला अनुभवाचे मोल पटले. त्यामुळे आधी बदली खेळाडू असलेला महंमद आमीर आणि वहाब रियाझ यांना पाचारण करण्यात आले.

त्यानंतर जुनैदने तोंडावर काळी पट्टी बांधलेला फोटो पोस्ट केला आणि ट्विट केले की सच कडवा होता है. त्याचे हे ट्विट बरेच गाजले, पण वर्ल्ड कप सुरु झाल्यानंतर जुनैदने ते डिलीट केले. तो पाक संघाला प्रोत्साहन देऊ लागला. त्याने पाकिस्तान झिंदाबाद हा हॅशटॅगही केला. दर वेळी तो संघाच्या कामगिरीला दाद देऊ लागला.

रायुडूने मात्र 3D गॉगल्सच्या ट्वीटनंतर काहीच केले नाही. उलट जसप्रीत बुमराचा यॉर्कर लागून विजय शंकर जायबंदी झाला तेव्हा रायुडूने त्याच्यावर चेटूक केल्याचे एक ट्विट झाले. ते विडंबन करणारे असले तरी त्यातून रायुडूची भारतीय क्रिकेटप्रेमींच्या मनातील प्रतिमा काय आहे हेच स्पष्ट झाले.

मयांकला पसंती देताना निवड समितीने पृथ्वी शॉ याच्यासारखा नव्या रक्ताचा तसेच अजिंक्य रहाणे किंवा श्रेयस अय्यर असे अनुभवी खेळाडू यांचे पर्याय असूनही ते निवडले नाहीत. यातून निवड समिती भविष्यासाठी संघबांधणी करीत असल्याचे स्पष्ट होते. खरे तर अय्यरला यापूर्वी संधी मिळाली आहे, रहाणे तर मागील वर्ल्ड कपमध्ये संघात होता. तो इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळत आहे.

या पार्श्वभूमीवर रायुडू मात्र आता उरलो आता आयपीएलपुरता अशीच स्थिती झाली आहे. वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर झाल्यानंतर सुद्धा रायुडूने आयपीएलमधील सामन्यांत चेन्नई सुपर किंग्जसाठी सर्वस्व पणास लावले नव्हते. त्याची देहबोली पाहून केवळ नकारात्मकता डोकावत होती. त्याचे ट्विट हेच दाखवित होते. त्यामुळेच वर्ल्ड कपचा लाडू हुकलेल्या रायुडूची बदली खेळाडू म्हणूनही रदबदली होणे अटळ ठरते.