नदालला अकराव्यांदा उपांत्य फेरीत 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 8 जून 2018

स्पेनच्या रॅफेल नदाल याने पहिल्या सेटमधील पराभवानंतर आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत दिएगो श्‍वार्टझमन याचा 4-6, 6-3, 6-2, 6-2 असा पराभव केला. नदालने फ्रेंच ओपन स्पर्धेत अकराव्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला. 
 

पॅरिस - स्पेनच्या रॅफेल नदाल याने पहिल्या सेटमधील पराभवानंतर आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत दिएगो श्‍वार्टझमन याचा 4-6, 6-3, 6-2, 6-2 असा पराभव केला. नदालने फ्रेंच ओपन स्पर्धेत अकराव्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला. 

श्‍वार्टझमन याने पहिला सेट जिंकून सनसनाटी सुरवात केली होती. मात्र, त्यानंतर त्याला नदालच्या झंझावाताचा सामना करता आला नाही. पावसाच्या व्यत्ययामुळे काल बुधवारी लढत थांबविण्यात आली होती. आज पुढे खेळायला सुरवात केल्यावर श्‍वार्टझमनच्याच सर्व्हिसवर चौथ्या मॅच पॉइंटला त्याने विजय मिळविला. 

उपांत्य फेरीत नदालची गाठ आता अर्जेंटिनाच्यात ज्युआन मार्टिन डेल पोट्रो याच्याशी पडणार आहे. त्याने क्रोएशियाच्या तिसऱ्या मानांकित मरिन चिलीचचा 7-6, 5-7, 6-3, 7-5 असा पराभव केला. 

एखाद्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धेची अकराव्यांदा उपांत्य फेरी गाठणारा नदाल हा केवळ तिसराच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी जिमी कॉनर्सने अमेरिकन आणि रॉजर फेडररने विंबल्डन तसेच ऑस्ट्रेलियन स्पर्धेत अशी कामगिरी केली आहे. 

नदालची सुरवात डळमळीत होती. त्याला पहिला सेट गमवावा लागला. या स्पर्धेत 2015 नंतर प्रथमच नदालला एखादा सेट गमवावा लागला. त्यानंतर मात्र नदालचा खेळ त्याच्या लौकिकाला साजेसा होता. त्याने अखेरच्या दोन सेटमध्ये श्‍वार्टझमनची सर्व्हिस चार वेळा भेदताना विजयाची औपचारिकताच जणू पूर्ण केली. 

Web Title: Nadal 11th time in the semifinal