महाराष्ट्राच्या अर्चना आढावला सुवर्ण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

नागपूर - भुवनेश्‍वर येथे आशियाई ॲथलेटिक्‍स स्पर्धेत दुसऱ्या धावपटूला अडथळा निर्माण केल्याने सुवर्णपदक गमाविलेल्या महाराष्ट्राच्या अर्चना अाढावने चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सुरू असलेल्या ५७ व्या खुल्या राष्ट्रीय ॲथलेटिक्‍स स्पर्धेत पंधराशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. 

नागपूर - भुवनेश्‍वर येथे आशियाई ॲथलेटिक्‍स स्पर्धेत दुसऱ्या धावपटूला अडथळा निर्माण केल्याने सुवर्णपदक गमाविलेल्या महाराष्ट्राच्या अर्चना अाढावने चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सुरू असलेल्या ५७ व्या खुल्या राष्ट्रीय ॲथलेटिक्‍स स्पर्धेत पंधराशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. 

‘तेल्हारा एक्‍स्प्रेस’ म्हणून ओळख असलेल्या अर्चनाचा मूळ प्रवेशिकेत पंधराशे मीटरसाठी समावेश नव्हता. तिने पंधराशे मीटर शर्यतीत सहभागी होण्याचा निर्णय घेताना तिने आवडत्या आठशे मीटर शर्यतीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धेची पात्रता गाठण्याच्या उद्देशाने तिच्या प्रशिक्षकाने हा निर्णय घेतल्याचे कळते. पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनीत घडलेली व सध्या राष्ट्रीय शिबिरात असलेल्या अर्चनाने ४ मिनिटे १८.६४ सेकंदात शर्यत पूर्ण केली आणि महाराष्ट्राला स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. रेल्वेच्या मोनिका चौधरीने रौप्य (४ मि.१९.१५ सें) आणि रेल्वेच्याच प्रमिला यादवने ब्राँझपदक (४ मि.२७.३९ सें) जिंकले. ११० मीटर हर्डल्स शर्यतीत राष्ट्रीय विक्रमवीर सिद्धांत थिंगलयाने लीलया सुवर्णपदक (१४.०६ सेंकद) जिंकले. 

आशियाई इनडोअर स्पर्धेत पेन्टथलॉनमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या रेल्वेच्या पुर्णिमा हेम्ब्रमने १०० मीटर हर्डल्स शर्यतीत बाजी मारली. तिने १३.८९ सेकंद अशी वेगवान वेळ दिली. झारखंडच्या अनुरूपा कुमारीला रौप्य आणि रेल्वेच्या सोमियाला ब्राँझपदक मिळाले. या इव्हेंटमध्ये शालेय व ज्युनिअर पातळीवर सलग पाच वर्षे अपराजित असलेल्या महाराष्ट्राच्या अंकिता गोसावीची सहाव्या स्थानावर घसरण झाली होती. तिने १४.४६ सेकंद वेळ दिली. 

सदात, अर्चना वेगवान धावपटू
सेनादलाच्या एम. डी. सदात आणि तमिळनाडूच्या एस. अर्चनाने शंभर मीटरची शर्यत जिंकून वेगवान धावपटूचा मान मिळविला. २० वर्षीय सदातने ‘फोटोफिनिश’मध्ये तमिळनाडूच्या एलक्कीदासनवर मात केली. दोघांनी १०.५७ सेकंद अशी वेळ दिली. सेनादलाच्या विद्यासागरला ब्राँझपदक (१०.६० सेकंद) मिळाले. महिलांत तमिळनाडूच्या एस. अर्चनाने ११.७८ सेकंदात शर्यत जिंकली. तिची सहकारी चंद्रलेखा रौप्यपदकाची मानकरी ठरली. महाराष्ट्राच्या चैत्राली गुजरला उपांत्य फेरीत पाचवे स्थान मिळाले.

Web Title: nagpur news Archana adhav sports