नागपूरची महिला फिडे मास्टर दिव्या देशमुखची आगेकूच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

नागपूर - नागपूरची महिला फिडे मास्टर दिव्या देशमुखने दिल्ली येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत श्रीलंकेच्या पावलचंद्रन अश्‍विनीला पराभूत करून लागोपाठ दुसरा विजय नोंदविला.

नागपूर - नागपूरची महिला फिडे मास्टर दिव्या देशमुखने दिल्ली येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत श्रीलंकेच्या पावलचंद्रन अश्‍विनीला पराभूत करून लागोपाठ दुसरा विजय नोंदविला.

१२ वर्षांखालील मुलींच्या गटात सहभागी अव्वल मानांकित दिव्याने सोमवारी पहिल्या फेरीत श्रीलंकेच्याच मापा एम. हिला पराभूत केले होते. दुसऱ्या फेरीअखेर दिव्या व अन्य पाच बुद्धिबळपटू प्रत्येकी दोन गुणांसह संयुक्‍त आघाडीवर आहेत. १४ वयोगटात खेळत असलेला अन्य एक नागपूरकर संकल्प गुप्ताने धनुष राघवला मात दिली. तृतीय मानांकित संकल्पने सलामी लढतीत भारताच्या राकेश एन. याला पराभूत केले होते. तिसऱ्या फेरीत दिव्याची लढत ध्यान पटेलशी होईल. संकल्प समदानी साहिल सागरविरुद्ध खेळेल.

अनुप देशमुखचा ग्रॅण्डमास्टरला दणका
दीड महिन्यांच्या युरोप दौऱ्यावर असलेला नागपूरचा आंतरराष्ट्रीय मास्टर अनुप देशमुखला स्पेनमध्ये मंगळवारी संपलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत २४ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. अनुपला नऊपैकी केवळ साडेपाच गुण मिळविता आले. त्याने शेवटच्या फेरीत अल्जेरियाचा ग्रॅण्डमास्टर रिझूक ऐमेनला पराभवाचा दणका दिला. पाच तासपर्यंत रंगलेल्या या लढतीत अनुपने ऐमेनला ५२ व्या चालीत मात दिली. या कामगिरीबद्दल अनुपला रोख शंभर  युरोचा पुरस्कार देण्यात आला. स्पर्धेत अनुपने चार लढती जिंकल्या, तर तीन बरोबरीत  सोडविल्या. दोनमध्ये त्याला पराभव पत्करावा लागला.

Web Title: nagpur news divya deshmukh chess