पीएसपीबी अंतिम फेरीत

पीएसपीबी अंतिम फेरीत

नागपूर - भारतातील सर्वोत्तम बॅडमिंटनपटूचा समावेश असलेल्या पेट्रोलियम स्पोर्टस प्रमोशन बोर्डाने उपांत्य फेरीत यजमान महाराष्ट्राचा ३-१ अशा फरकाने पराभव करत ७३ व्या सीनिअर आंतरराज्य बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. त्यांनी सलग २०व्यांदा या स्पर्धेची अंतिम लढत गाठण्याची कामगिरी केली.

प्रतिस्पर्धी तुल्यबळ असूनही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सहजासहजी हार मानली नाही. त्यात कौशल धर्मामेरचा विजय महत्वपूर्ण ठरला. त्याने ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या गुरुसाई दत्तला पराभूत करून महाराष्ट्राला १-१ अशी बरोबरी साधून दिली होती. पहिला गेम २१-१४ असा जिंकल्यानंतर दुसरा गेम कौशलने २०-२२ असा गमाविला. तिसऱ्या गेममध्ये ५-४ अशी आघाडी असताना सलग नऊ गुण जिंकून गेम २१-११ असा खिशात घातला. त्यापूर्वी पहिल्या मिश्र दुहेरीत मनू अत्री आणि सिक्की रेड्डी या अनुभवी जोडीने अक्षय देवलकर व संजना संतोषवर २१-१६, २१-१४ असा विजय मिळवून पीएसपीबीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. 

महिला एकेरीत महाराष्ट्राच्या नेहा पंडितने ऋत्विका शिवानीविरुद्ध आक्रमक सुरवात केली. मात्र, तिला लय कायम ठेवता आली नाही. ६-१ अशी आघाडी घेणाऱ्या नेहाने पहिला गेम १२-२१ तर दुसरा गेम १५-२१ असा गमाविला. पुरुष दुहेरीत मनू अत्री व प्रणव जेरी चोप्राने अक्षय देवलकर आणि प्रसाद शेटटीला २१-१३, २१-९ असे नमविले आणि पीएसपीबीला अंतिम फेरी गाठून दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com