French Open 2019 : अग्रमानांकित जपानी नाओमी ओसाका बचावली

osaka.jpeg
osaka.jpeg

वृत्तसंस्था : फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित जपानची नाओमी ओसाका सलामीलाच गारद होण्यापासून बचावली. जागतिक क्रमवारीत 90व्या स्थानावर असलेल्या स्लोव्हाकियाच्या ऍना कॅरोलना श्‍मैडलोवाविरुद्ध तिची लढत होती. त्यात नाओमीने पहिला सेट लव्हने गमावला होता. पण अखेरीस नाओमीने 0-6, 7-6 (7-4), 6-1 असा विजय मिळविला.

ऑस्टापेन्को पराभूत 
केवळ दोन मोसमांपूर्वी विजेती ठरलेली लॅट्वियाची जेलेना ऑस्टापेन्को पहिल्याच फेरीत हरली. दोन वेळची ऑस्ट्रेलियन विजेती व्हिक्‍टोरिया अझारेन्का हिने तिला 6-4, 7-6 (7-4) असे हरविले. बेलारूसच्या व्हिक्‍टोरियाची 43व्या क्रमांकावर घसरण झाली. हा सामना नाट्यमय ठरला. पहिले नऊ गेम दोघींपैकी कुणालाच सर्व्हिस राखता आली नाही. मग अखेर अझारेन्काने ही शर्यत जिंकत 5-4 अशी आघाडी घेतली. हा सेट जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये तिने दोन मॅचपॉइंट वाया घालविले. तिची सर्व्हिस दुसऱ्यांदा खंडित झाली. अखेरीस टायब्रेकमध्ये गेलेला सेट जिंकून तिने आगेकूच नक्की केली. 

ऑस्टापेन्कोची 39व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तिला चार वर्षांत तिसऱ्यांदा पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागले. यंदा ऑस्ट्रेलियन ओपनमध्येही ती दुसरी फेरी गाठण्यात अपयशी ठरली होती. 
व्हिक्‍टोरियाला यंदा क्‍ले कोर्ट मोसमात चांगलाच फॉर्म गवसला आहे. तिने चेक प्रजासत्ताकाची कॅरोलीना प्लिस्कोवा आणि युक्रेनची एलिना स्विटोलीना यांना हरविले आहे. 

झ्वेरेवला कडवी झुंज

पाचवा मानांकित अलेक्‍झांडर झ्वेरेव आणि आठवा मानांकित जुआन मार्टिन डेल पोट्रो यांना विजयासाठी झगडावे लागले. दोघांचे प्रतिस्पर्धी "टॉप फिफ्टी' बाहेरील आहेत. ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमन याने तर झ्वेरेवला चार तासांहून जास्त वेळ झुंजविले. 

जर्मनीच्या झ्वेरेवची प्रतिभाशाली युवा खेळाडूंमध्ये गणना होते. त्याने 56व्या स्थानावरील मिलमनला 7-6 (7-4), 6-3, 2-6, 6-7 (5-7), 6-3 असे हरविले. पिछाडीवर असताना झ्वेरेवने अनेक वेळा रॅकेट कोर्टवर आपटली. गेल्या वर्षी त्याने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. त्यानंतर मोसमाची सांगता करताना त्याने नोव्हाक जोकोविचला हरवून "एटीपी फायनल्स' स्पर्धा जिंकली होती. यंदाचा मोसम त्याच्यासाठी फारसा उल्लेखनीय ठरलेला नाही. ऑस्ट्रेलियन ओपनच्या चौथ्या फेरीत त्याला कॅनडाच्या मिलॉस राओनीच याने हरविले होते. 

डेल पोट्रोचाही संघर्ष 

अर्जेंटिनाच्या डेल पोट्रोने 58व्या क्रमांकावर असलेल्या चिलीच्या निकोलस जॅरी याचे आव्हान पहिल्या सेटच्या पिछाडीनंतर 3-6, 6-2, 6-1, 6-4 असे परतावून लावले. 23 वर्षांच्या जॅरीने पहिला सेट जिंकल्यानंतर पाच वेळा सर्व्हिस गमावली. डेल पोट्रोने दहा वर्षांपूर्वी अमेरिकन विजेतेपद मिळविले होते. त्यानंतर त्याला ग्रॅंड स्लॅम यशाची प्रतीक्षा आहे. 30 वर्षांच्या डेल पोट्रोने गेल्या वर्षी उपांत्य फेरी गाठली होती. तो स्पेनच्या रॅफेल नदाल याच्याकडून तीन सेटमध्ये हरला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com