ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची दुर्दशा झालीये! हा घ्या पुरावा!!

Nathan Lyon has the highest average amongst Australians in test series against India
Nathan Lyon has the highest average amongst Australians in test series against India

मेलबर्न : मैदानावर खडूस वागण्याबरोबरच भेदक गोलंदाजी आणि चिवट फलंदाजी ही ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची वैशिष्टये गेल्या काही वर्षांमध्ये लुप्त झाली आहेत. म्हणजे, खडूस वागणं अगदी आतापर्यंत सुरू होते.. गोलंदाजीही पूर्वीसारखी तिखट राहिलेली नाही आणि फलंदाजीमध्ये तर दुर्दशाच झाली आहे. भारताविरुद्ध मायदेशात सुरू असलेल्या मालिकेमध्ये या उणीवा ठळकरित्या समोर आल्या आहेत. 

घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणणे हे एकेकाळी आशियाई संघांसाठी दिवास्वप्नच होते. पण यंदाच्या भारतीय संघाने ही कमाल करून दाखविली आहे. पहिली कसोटी जिंकून भारताने चार सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुसरी कसोटी जिंकत ऑस्ट्रेलियाने 1-1 अशी बरोबरी केली. आता तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलिया पुन्हा पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. यामध्ये सर्वांत ठसठशीत अपयश दिसत आहे ते ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे! 

या मालिकेतील आतापर्यंतच्या सामन्यांमधील आकडेवारीचा विचार केला, तर ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक सरासरी असलेला फलंदाज नॅथन लायन आहे. यावरूनच ऑस्ट्रेलियाच्या सध्याच्या संघातील फलंदाजीतील दर्जा लक्षात येतो. आतापर्यंतच्या तीन सामन्यांत ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा ट्रॅव्हिस हेडने (217) केल्या आहेत. त्याखालोखाल सलामीवीर मार्कस हॅरिस (177), शॉन मार्श (175), टीम पेन (169) यांचा समावेश आहे. पण सर्वाधिक सरासरी नॅथन लायनचीच (41) आहे. विशेष म्हणजे, या मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक विकेट्‌सही लायननेच घेतल्या आहेत. त्याने आतापर्यंत 17 गडी बाद केले आहेत. 

मालिकेत दोन्ही संघ मिळून सर्वाधिक धावा चेतेश्‍वर पुजाराच्या (328) आहेत. त्यानंतर विराट कोहलीने 259 धावा केल्या आहेत. सरासरीमध्येही पुजाराच (54.66) अव्वल आहे. मालिकेत सर्वाधिक विकेट्‌स घेणाऱ्यांच्या यादीत जसप्रित बुमरा (19) आघाडीवर आहे. 

चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणी बंदीला सामोरे जावे लागलेल्या डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरुन बॅंक्रॉफ्ट हे तीन चांगले फलंदाज ऑस्ट्रेलियाला गमवावे लागले. या तिघांची जागा भरून काढणारे खेळाडू ऑस्ट्रेलियाला अद्याप सापडलेले नाहीत. वॉर्नरच्या अनुपस्थितीत सलामीचा प्रश्‍नही ऑस्ट्रेलियाला भेडसावत आहे. त्याच्या जागी सलामीला संधी मिळालेल्या ऍरॉन फिंचवर चहुबाजूंनी टीका होत आहे. सलामीला खेळण्यासाठी लागणारे कौशल्य आणि तंत्र फिंचकडे नसल्याचे मत ऑस्ट्रेलियाच्याच अनेक माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केले आहे. फिंचने आतापर्यंतच्या तीन सामन्यांत केवळ 97 धावा केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com