राष्ट्रीय कबड्डी मार्गदर्शकांना नियुक्तीपत्राची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

भारतीय कबड्डी महासंघाने राष्ट्रीय स्पर्धेसाठी सहा मार्गदर्शकांची निवड केली असली तरी अद्याप त्यांना नियुक्तीचे पत्रही पाठवलेले नाही. नियमित एका प्रमुख राष्ट्रीय मार्गदर्शकांऐवजी तिघांची निवड केल्यामुळे आपले नेमके काम काय, हाच प्रश्‍न या कबड्डी मार्गदर्शकांना पडला आहे.

मुंबई : भारतीय कबड्डी महासंघाने राष्ट्रीय स्पर्धेसाठी सहा मार्गदर्शकांची निवड केली असली तरी अद्याप त्यांना नियुक्तीचे पत्रही पाठवलेले नाही. नियमित एका प्रमुख राष्ट्रीय मार्गदर्शकांऐवजी तिघांची निवड केल्यामुळे आपले नेमके काम काय, हाच प्रश्‍न या कबड्डी मार्गदर्शकांना पडला आहे.

भारतीय कबड्डी महासंघाचे प्रशासक (निवृत्त) न्यायाधीश एस. पी. गर्ग यांनी शुक्रवारी एका पत्रकाद्वारे भारतीय कबड्डी महासंघासाठी सहा मार्गदर्शकांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले. त्यात पुरुषांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बलवान सिंग, अर्जुन पुरस्कार विजेते आशन कुमार तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या गांधीनगर केंद्रातील कबड्डी मार्गदर्शक जयवीर शर्मा यांची पुरुष संघासाठी निवड केली; तर महिला संघासाठी द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या सुनील डब्बास तसेच शैलजा जैन आणि बनानी साहा या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शकांना निवडले आहे, पण या मार्गदर्शकांना नियुक्तीचे पत्रही अद्याप पाठवले नसल्याचे सांगितले जात आहे.

आपली नियुक्ती कोणत्या स्पर्धेसाठी आहे, कोणत्या संघास मार्गदर्शन करायचे आहे, याचीही त्यांना माहिती नाही. एवढेच नव्हे, तर भारतीय कबड्डी महासंघाच्या संकेतस्थळावरील पत्रक वाचल्यामुळे आपल्याला नियुक्तीबाबत कळले, असेही या मार्गदर्शकांनी सांगितले आहे. काहींना नियुक्तीचे नेमके स्वरूप कळत नाही; त्यामुळे राष्ट्रीय मार्गदर्शक म्हणून संघासोबत असणार का, हेही नेमके कळत नाही. त्यामुळे अन्य देशातील प्रस्ताव आल्यास काय करायचे हा प्रश्‍नही सतावत आहे.

भारतीय संघासाठी यापूर्वी फार तर दोन मार्गदर्शक नियुक्त होत असत, पण त्यापैकी एक प्रमुख आणि दुसरे सहायक असत. या वेळी तिघांची नियुक्ती आहे. याकडे लक्ष वेधल्यावर बनानी साहा यांनी यापूर्वी दोन मार्गदर्शक असत, नेमके काम काय हे शिबिराच्या ठिकाणी गेल्यावरच समजेल, अर्थात हे सर्व पत्रात असेल, असेही सांगितले.

भारतीय कबड्डी महासंघाच्या संकेतस्थळावर मार्गदर्शकांच्या नियुक्तीचे पत्रक आहे आणि त्यात माझे नाव असल्याचे कळले. अद्याप नियुक्तीचा ई-मेल किंवा पत्र आलेले नाही. हे पत्र आल्यावरच नेमके सांगता येईल,
- बनानी साहा, भारतीय महिला मार्गदर्शिका

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: national kabaddi coach awaits apointment letter