महाराष्ट्र पुरुष संघ उपांत्य फेरीत

महाराष्ट्र पुरुष संघ उपांत्य फेरीत

जोधपूर - महाराष्ट्राने राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील आपली घोडदौड दिमाखात चालू ठेवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्राने  यजमान राजस्थानवर ३५-२३ असा १२ गुणांनी मोठा विजय संपादन केला. यापूर्वी महाराष्ट्राने २००७ मध्ये अमरावतीमधील स्पर्धेत दिल्लीला हरवून विजेतेपद मिळविले होते. त्यानंतरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. आता महाराष्ट्राची सेनादलाशी लढत होईल. दुसरा उपांत्य सामना रेल्वे-हरियाना असा होईल.

दिल्लीविरुद्ध चमकलेल्या काशिलिंग आडके व मंगेश भगत या दोघांच्या खोलवर चढायांचा मोलाचा वाटा होता. काशिलिंगचे बोनससह नऊ गुण व सातही टचपॉइंट जिंकलेल्या मंगेशच्या आक्रमक चढायांसमोर राजस्थान हतप्रभ झाला. विकास काळे, गिरीश इरनाक व नीलेश शिंदे यांच्या पकडींची सुरेख साथ मिळाली. राजस्थानच्या अनुभवी जसवीर सिंगला एकही गुण मिळविता आला नाही. त्यातच त्यांचा हुकमी एक्का दिपक हुडा दुखापतीमुळे चढाई करु शकला नाही. याचा फायदा महाराष्ट्राने पुरेपूर उठविला. 

त्याआधी बाद फेरीत महाराष्ट्राने दिल्लीचे आव्हान एकतर्फी लढतीत ३४-१७ असे परतवून लावले.

महाराष्ट्राच्या मंगेश भगत आणि काशिलिंग आडके यांच्या चौफेर चढायांनी दिल्लीचा बचाव खिळखिळा केला होता. मंगेशने मिळविलेले ‘टच’ आणि आडकेचे ‘बोनस’ पॉइंट यामुळे महाराष्ट्राचा गुणफलक झटपट वाढत होता. त्याच वेळी सोमशेखर आणि रोहित चौधरी हे दिल्लीचे अनुभवी खेळाडू महाराष्ट्राचे सुरक्षा कवच भेदू शकले नाहीत. कर्णधार विकास काळे, नीलेश शिंदे आणि गिरीश इरनाक यांनी दिल्लीच्या चढाईपटूंची कोंडी केली. 

त्यापूर्वी महाराष्ट्राने विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताच्या विजयाचा हीरो ठरलेल्या अजय ठाकूरच्या हिमाचल प्रदेश संघाचा ३४-३१ असा पराभव करून गटातील आपले अपराजित्व कायम राखले होते. अजयला या सामन्यात सूरच गवसला नाही. त्याच्या चार वेळा पकडी करून महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशवर कायम दडपण ठेवले. 

या सामन्यातही नीलेश शिंदे आणि गिरीश इरनाक यांचा बचाव आणि काशिलिंग आडके, नीलेश साळुंखेच्या चढाया निर्णायक ठरल्या होत्या. महाराष्ट्राने गटात यापूर्वी कर्नाटक, पंजाब, बिहार, त्रिपुरा या संघांवरदेखील एकतर्फी विजय मिळविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com