हरियानाला हरवून सेनादलाला विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

जोधपूर - अनुभवी नितीन तोमर आणि प्रदीप नरवाल यांच्या चतुरस्र खेळाच्या जोरावर सेनादल संघाने यंदाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले.

जोधपूर - अनुभवी नितीन तोमर आणि प्रदीप नरवाल यांच्या चतुरस्र खेळाच्या जोरावर सेनादल संघाने यंदाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद मिळविले.

अंतिम लढतीत त्यांनी अनुपकुमारच्या तुल्यबळ हरियाना संघाचा ३९-२२ असा पराभव केला. रेल्वेचे आव्हान परतवणाऱ्या हरियानाला अंतिम लढतीत सेनादलाचे सुरक्षा कवच भेदता आले नाही. उपांत्य फेरीत महाराष्ट्रावर एकतर्फी विजय मिळविताना उत्तरार्धात प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय सेनादलाच्या रणनीतीची कल्पना देऊन गेला. त्यांचा हा निर्णय किती महत्त्वाचा होता, हे अंतिम फेरीत तोमर आणि प्रदीपच्या खेळावरून दिसून आले. चढाई आणि पकड या दोन्ही आघाडीवर सेनादलाचे वर्चस्व होते. त्यांनी चढाईत १७, तर पकडीत १४ गुण कमावले होते. दोन्ही सत्रात त्यांनी हरियानावर एकेक लोण चढवला.

हरियानाकडून अनुपकुमार, सुजीत नरवाल यांचा खेळ उल्लेखनीय झाला; पण सेनादलाच्या खेळाडूंनी कौशल्याला दिलेली ताकदीची जोड निर्णायक ठरली. 
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट बचावपटू म्हणून संदीप नरवालची निवड करण्यात आली. सर्वोत्कृष्ट चढाईसाटी प्रदीप नरवाल आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून नितीन तोमर याची निवड करण्यात आली. कर्णधार नितीन तोमर याने सामन्यानंतर बोलताना प्रत्येक खेळाडूच्या प्रयत्नांना दाद दिली. सर्वोत्तम सांघिक खेळाचे प्रदर्शन केल्यामुळेच हा विजय साकार झाल्याचे त्याने सांगितले. 

Web Title: national kabaddi competition