ठाण्याचा सौरभ विजयी; पोलवरील ध्रुव तिसरा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

चेन्नई - ठाण्याच्या सौरव बंदोपाध्याय याने ॲमिओ करंडक राष्ट्रीय रेसिंग मालिकेच्या दुसऱ्या फेरीतील पहिली शर्यत जिंकली. पहिल्या फेरीत वर्चस्व राखलेल्या कोल्हापूरच्या ध्रुव मोहितेला तिसरा क्रमांक मिळाला.

चेन्नई - ठाण्याच्या सौरव बंदोपाध्याय याने ॲमिओ करंडक राष्ट्रीय रेसिंग मालिकेच्या दुसऱ्या फेरीतील पहिली शर्यत जिंकली. पहिल्या फेरीत वर्चस्व राखलेल्या कोल्हापूरच्या ध्रुव मोहितेला तिसरा क्रमांक मिळाला.

मद्रास मोटर स्पोर्टस क्‍लबच्या ट्रॅकवर ध्रुवने पात्रता फेरीतील अव्वल वेळेसह पोल पोझिशन मिळवून सुरवात चांगली केली होती; पण प्रत्यक्ष शर्यतीत सौरवने पहिल्याच लॅपला आघाडी घेतली. त्यानंतर त्याने एकाग्रतेने नियंत्रित ड्रायव्हिंग केले. दुसऱ्या क्रमांकासाठी गाझियाबादचा अनमोल सिंग व बंगळूरचा शुबोमॉय बाल यांच्यात चुरस झाली, त्यात थोडा मागे पडल्यानंतर अनमोल सावरला. त्याने अखेरच्या लॅपला ध्रुवला मागे टाकले.

तीन किलोमीटर ७१६ मीटर अंतराच्या ट्रॅकवर आठ लॅपमध्ये शर्यत झाली. अनमोलने एक मिनीट ५६.३९० सेकंद अशी सर्वोत्तम वेळ नोंदविली. त्याने ताशी ११५.४ किलोमीटर वेग राखला. सौरवची सर्वोत्तम वेळ १ः५६.३९०, तर ध्रुवची १ः५६.४३५ सेकंद होती.

फोक्‍स वॅगनचे रेसिंगप्रमुख शिरीष विस्सा यांनी सांगितले, की ओव्हरटेकिंगमुळे ही शर्यत रंगतदार ठरली. हवामान अनुकूल नसताना ड्रायव्हरनी कारची क्षमता पणास लावली. गोव्याच्या अक्षय भिवशेटीने नववा, मुंबईच्या जय संघार्जकाने दहावा, आयुष टैनवालाने ११वा, तर पुण्याच्या प्रतीक सोनावणेने शेवटचा १५वा क्रमांक मिळविला.

Web Title: National Racing Series competition