नीरज चोप्रा विश्‍व स्पर्धेसाठी पात्र 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

नीरजने चौथ्या प्रयत्नात आज 83.32 मीटर भाला फेकला आणि लंडनसाठी असलेली 83 मीटरची पात्रता पार केली. पहिल्या टप्प्यात त्याने 82.11 मीटर अंतरावर फेक केली होती. आज पात्रता गाठली असली, तरी नीरजला रौप्यपदकच मिळाले.

जियाझिंग (चीन) - आशियाई ग्रांप्री ऍथलेटिक्‍स स्पर्धेतील दुसऱ्या टप्यात ज्युनिअर विश्‍वविजेत्या नीरज चोप्राने भालाफेकीत रौप्यपदक मिळवत लंडन येथे होणाऱ्या विश्‍व ऍथलेटिक्‍स स्पर्धेची पात्रता गाठली. दुसऱ्या टप्प्यातील या स्पर्धेत गुरुवारी भारताच्या व्ही. नीना हिने लांब उडीत सुवर्णपदक जिंकले. 

नीरजने चौथ्या प्रयत्नात आज 83.32 मीटर भाला फेकला आणि लंडनसाठी असलेली 83 मीटरची पात्रता पार केली. पहिल्या टप्प्यात त्याने 82.11 मीटर अंतरावर फेक केली होती. आज पात्रता गाठली असली, तरी नीरजला रौप्यपदकच मिळाले. पहिल्या टप्प्यातील विजेता तैवानच्या चेंग चाओने विजयी मालिका कायम ठेवत 86.92 मीटर कामगिरीसह चीनसाठी सुवर्ण आणि नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. त्याची ही कामगिरी आशियातील सर्वोत्तम ठरली. आजच्या कामगिरीनंतर नीरज जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर आला आहे. 

महिलांच्या लांब उडीत भारताची व्ही. नीना आणि चीनची झू झाओलिंग यांच्यात चुरस झाली. दोघींनी 6.37 मीटर अशीच सारखी उडी मारली. मात्र, नीनाची दुसरी सर्वोत्तम उडी 6.32 अशी दोनदा असल्याने तिला विजयी घोषित करण्यात आले. झू हिला एकदाच 6.32 मीटरवर उडी मारता आली. पहिल्या टप्प्यात नीनाला रौप्यपदक मिळाले होते. 

पहिल्या टप्प्यात नवीन राष्ट्रीय विक्रम करून लंडनची पात्रता गाठणाऱ्या मनप्रीत कौरला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. 17.44 मीटर वर गोळा फेकल्याने तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या आठशे मीटर शर्यतीत रिओ ऑलिंपियन जिन्सॉन जॉन्सनची 1 मिनिट 53.76 सेकंदात आठव्या स्थानावर घसरण झाली. महिलांच्या आठशे मीटर शर्यतीत टिंटू लुकाने 2 मिनिटे 06.32 सेकंदात रौप्य तर शंभर मीटर शर्यतीत द्युती चंदने 11.57 सेकंदात रौप्यपदक जिंकले. 

Web Title: Neeraj Chopra, junior world javelin champ, qualifies for London Worlds