
Neeraj Chopra : ऑलिंपिक विजेता नीरज चोप्रा ९० मीटरचे लक्ष्य गाठणार ?
दोहा - यंदा जागतिक मैदानी स्पर्धेसोबत आशियाई ॲथलेटिक्स आणि आशियाई क्रीडा स्पर्धा अशा महत्त्वाच्या स्पर्धा असल्याने भारतीय खेळाडूंच्या तयारी व कामगिरीबाबत साहजिकच उत्सुकता आहे. त्यात ऑलिपिंक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा प्रमुख आहे. तो मोसमाची सुरुवात दोहा डायमंड लीग स्पर्धेतील सहभागाने करणार आहे. डायमंड लीग विजेता म्हणून प्रथमच या स्पर्धेत सहभागी होत असलेला नीरज ९० मीटरपेक्षा अधिक कामगिरी करणार काय, ही उत्सुकताही आहेच.
गतवर्षी जागतिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या २५ वर्षीय नीरजला उद्या, शुक्रवारी होणाऱ्या स्पर्धेत विद्यमान विश्वविजेता ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स व टोकियो ऑलिंपिक रौप्यपदक विजेता झेकचा याकूब वाल्डेज यांचे आव्हान असेल. चोप्राची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ८९.९४ मीटर अशी असली,
तरी यापूर्वी दोहात चार वर्षांपूर्वी सहभागी झालेल्या स्पर्धेत त्याला ८७.४३ मीटर कामगिरीसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. गतवर्षी पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने त्याने या स्पर्धेत भाग घेतला नव्हता.
दोहात भाग न घेताही नीरजने गतवर्षी झुरिजमध्ये झालेली अंतिम फेरी जिंकली होती. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला होता. त्याचप्रमाणे महाअंतिम फेरीपूर्वी लुसानमध्ये झालेल्या स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले होते.
दिग्गजांचे आव्हान
विश्वविजेत्या पीटर्सने गतवर्षी ९३.०७ मीटर अंतरावर भाला फेकताना सार्वकालीन पाचवी सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली होती. वाल्डेजनेही गतवर्षी ९०.८८ मीटर अशी कामगिरी केली होती.
यांच्याशिवाय दोहामध्ये नीरजपुढे युरोपियन विजेता जर्मनीचा ज्युलियन वेबर, २०१२ चा ऑलिंपिक विजेता त्रिनिदादचा केशॉर्न वॉलकॉट, माजी विश्वविजेता केनियाचा ज्युलियन येगो यांचेही आव्हान असेल. अमेरिका आणि नंतर तुर्कीत सराव करणाऱ्या नीरजचे यंदा ९० मीटरपेक्षा अधिक फेक करणे हे प्रथम लक्ष्य आहे.
एल्डोस पॉलचाही सहभाग
नीरजशिवाय भारताचा आणखी एका खेळात दोहा डायमंड लीगमध्ये सहभागी होत आहे. २०२२ राष्ट्रकुल स्पर्धेत तिहेरी उडीत सुवर्णपदक जिंकणारा एल्डोस पॉल हा येथे सहभाग होत.
असून त्याच्यापुढे ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता पोर्तुगालचा पेड्रो पिचार्डो, विद्यमान डायमंड लीग विजेता क्युबाचा अँडी हर्नांडेझ, दोन वेळचा ऑलिंपिक सुवर्ण व पाच वेळा विश्वविजेतेपद मिळविणारा अमेरिकेचा ख्रिस्तियन टेलर यांचे आव्हान आहे. पॉलची सर्वोत्तम कामगिरी १६.९९ मीटर अशी आहे.
भालाफेक
एकूण स्पर्धक : १०
वेळ : रात्री ७.४४ (स्थानिक)