मोहम्मद शमी कारकीर्दीत सर्वोच्च स्थानी; जडेजा, अश्विनही 'टॉप टेन'मध्ये!

टीम ई-सकाळ
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

गोलंदाजीत तिखट मारा करणाऱ्या शमीने पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 4 असे एकूण 7 जणांना तंबूचा रस्ता दाखवला.

भारत आणि बांगलादेशमध्ये इंदूर येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर आयसीसीने फलंदाज, गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंची क्रमवारी जाहीर केली आहे.

या क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीने 8 स्थानांची झेप घेतली आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 4 विकेट घेतल्याने शमी त्याच्या कारकीर्दीतील सर्वोच्च अशा सातव्या स्थानावर पोहोचला आहे. बांगलादेशविरुद्ध कसोटी सामन्यापूर्वी तो 15 व्या स्थानावर होता.

इंदूर कसोटीच्या तिसऱ्या दिवशीच भारताने बांगलादेशवर एक डाव आणि 130 धावांनी भलामोठा विजय मिळवला. सलामीवीर फलंदाज मयांक अग्रवाल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांची कामगिरी मोलाची ठरली. गोलंदाजीत तिखट मारा करणाऱ्या शमीने पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 4 असे एकूण 7 जणांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याला आर. अश्विन, उमेश यादव, इशांत शर्मा यांनी चांगली साथ दिली.

महंमद शमीची घरच्या मैदानावर सर्वोत्तम कामगिरी 

- 5/35 वि. द. आफ्रिका, विशाखापट्टणम 2019/10 
- 5/47 वि. वेस्ट इंडीज, कोलकाता 2013/14 (पदार्पण) 
- 4/71 वि. वेस्ट इंडीज, कोलकाता 2013/14 
- 4/31 वि. बांगलादेश, इंदूर 2019/20* 

मोहम्मद शमीसह भारताच्या अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा आणि आर. अश्विन या दोघांनी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अनुक्रमे दुसरा आणि चौथा क्रमांक पटकावला आहे. अश्विनने एका स्थानाची झेप घेतली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New highs for Indian bowler Mohammed Shami in Test rankings