भारतीय प्रशिक्षकासाठी आता अटी आणि शर्थी 

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 जुलै 2019

- उमेदवार 60 वर्षांच्या आतील असावा 
- परदेशातील दोन वर्षांचा अनुभवी हवा 

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पुरुषांच्या संघाच्या प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागविले असून, त्यासाठी उमेदवारासमोर अटी आणि शर्थी ठेवल्या आहेत. यामध्ये प्रशिक्षकाचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असावे आणि त्याला दोन वर्षांचा परदेशातील अनुभव असावा, अशा दोन प्रमुख अटींचा समावेश आहे. 

"बीसीसीआय'ने विश्‍वकरंडक स्पर्धा संपल्यानंतर लगेचच भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्याच्या सपोर्ट स्टाफमध्ये प्रशिक्षकासह फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, फिजियो, तंदुरुस्ती प्रशिक्षक आणि प्रशासकीय व्यवस्थापक अशी पदे आहेत. यातील फक्त फिजिओ आणि तंदुरुस्ती प्रशिक्षक या जागा तातडीने भरल्या जाणार आहेत. उर्वरित प्रशिक्षकांना 45 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यांची निवड ही वेस्ट इंडीजच्या दौऱ्यानंतर करण्यात येणार आहे. 

फिजिओ फॅट्रिक फरहात आणि तंदुरुस्ती प्रशिक्षक शकंर बसू यांनी विश्‍वकरंडक स्पर्धेत उपांत्य फेरीत झालेल्या पराभवानंतर तातडीने आपल्या पदाचे राजिनामे दिल्यामुळे ही पदे तातडीने भरली जाणार आहेत. 
सध्या कार्यरत असणाऱ्या उमेदवारांची फेरनिवड होऊ शकते, पण त्यांनादेखील नव्याने अर्ज करावा लागणार आहे. शास्त्री प्रशिक्षकपदासाठी उत्सुक असतील, तर त्यांनादेखील पुन्हा अर्ज करावा लागेल, असे "बीसीसीआय'ने स्पष्ट केले आहे. शास्त्री यांची अनिल कुंबळे यांच्यानंतर 2017 मध्ये प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यापूर्वी 57 वर्षीय शास्त्री यांनी 2014 ते 2016 या कालावधीत भारतीय क्रिकेट संघाचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. 

अशा आहेत अटी 

मुख्य प्रशिक्षक :
- कुठल्याही कसोटी संघाला प्रशिक्षण दिल्याचा दोन वर्षांचा अनुभव आवश्‍यक. 
- तो नसेल, तर उमेदवार किमान तीन वर्षे सहयोगी सदस्य, अ संघ किंवा आयपीएल संघाशी जोडलेला असावा. 
- अर्जदाराने किमान 30 कसोटी किंवा 50 एकदिवसीय सामने खेळलेले असावेत. 
- त्याचे वय 60 वर्षाच्या आतील असावे. 
- फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षकांसाठी अशाच अटी राहतील. बदल असेल तो त्यांच्या सामन्यांच्या अनुभवात. या पदांसाठी अर्जदार 10 कसोटी किंवा 25 एकदिवसीय सामने खेळलेला असावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Rules and Regulations for appointment of coach of team India