AUS vs NZ : बदला घेतला! न्यूझीलंडने पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाला दाखवून दिली ताकद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Zealand Defeat Australia In T20 World Cup 2022 1st Super 12 Stage

AUS vs NZ : बदला घेतला! न्यूझीलंडने पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाला दाखवून दिली ताकद

T20 World Cup 2022 Australia Vs New Zealand : टी 20 वर्ल्डकप 2022 च्या सुपर 12 फेरीतील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने यजमान ऑस्ट्रेलियाला पाणी पाजले. गेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न तोडले होते. आता न्यूझीलंडने तब्बल 89 धावांनी सामना जिंकत काही अंशी त्या पराभवाचा बदला घेतला. दुसरीकडे गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पहिल्याच सामन्यात मोठ्या फरकाने हार पत्करावी लागली. डेवॉन कॉनवॉयच्या नाबाद 92 धावांच्या जोरावर न्यूझीलंडने 20 षटकात 3 बाद 200 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव 111 धावात गुंडळाला गेला. मिचेल सँटनर आणि टीम साऊदीने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

हेही वाचा: Glenn Phillips | VIDEO : जॉन्टीला विसरा आता! फिल्डिंगचा नवा आयकॉन 'फिलिप्स'

न्यूझीलंडने सिडनीवरील चेंडू थांबून येणाऱ्या खेळपट्टीचा पॉवर प्लेमध्ये चांगला वापर करून घेतला. टीम साऊदीने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्याने धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा अवघ्या 5 धावेवर त्रिफळा उडवला. त्यानंतर सँटनरने कर्णधार फिंचला 13 तर टीम साऊदीने शॉन मार्शला 16 धावांवर बाद करत कांगारूंची टॉप ऑर्डर पॅव्हेलियनमध्ये धाडली. 

ऑस्ट्रेलियाची टॉप ऑर्डर स्वस्तात माघारी गेल्यानंतर डाव सावरण्याची जबाबदारी मार्कस स्टॉयनिस आणि मॅक्सवेलवर होती. मात्र मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात स्टॉयनिस 14 चेंडूत 7 धावा करून बाद झाला. ग्लेन फिलिप्सने स्टॉनिसचा हवेत डाईव्ह मारत जबदस्त कॅच पकडला.

ऑस्ट्रेलियाचे 4 फलंदाज 50 धावातच गारद झाल्यानंतर मधली फळी थोडा प्रतिकार करेल असे वाटले होते. मात्र न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत ऑस्ट्रेलियाची अवस्था 7 बाद 89 अशी केली. टीम डेव्हिड 11 तर मॅथ्यू वेड 2 धावांची भर घालून परतले. तर मोठी आशा असलेला मॅक्सवेल देखील 20 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. त्याची शिकार इश सोधीने केली. यानंतर पॅट कमिन्सने 15 चेंडूत शतकी मजल मारून दिली. अखेर न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा डाव 111 धावात संपवत सामना 89 धावांनी जिंकला.

हेही वाचा: VIDEO: डेव्हिड वॉर्नरच्या नशिबाने दिला दगा अन्...

तत्पूर्वी, सलामीवीर डेवॉन कॉनवॉयच्या नाबाद 92 धावांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने 20 षटकात 3 बाद 200 धावा केल्या. त्याला साथ देणाऱ्या जेमी नीशमने 13 चेंडूत 26 धावा केल्या. निशमने 200 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याने हेजलवूडला शेवटच्या चेंडूवर षटाकर मारत न्यूझीलंडला 200 धावांपर्यंत पोहचवले. तर सलामीवीर फिन एलनने 16 चेंडूत 42 धावा चोपल्या. त्यानेही कांगारूंची 262.50 च्या स्ट्राईक रेटने धुलाई केली. ऑस्ट्रेलियाकडून हेजलवूडने 2 तर झाम्पाने 1 विकेट घेतली.