दक्षिण आफ्रिकेचे पॅकअप; न्यूझीलंडचा सहज विजय 

Kane Williamson
Kane Williamson

बर्मिंगहॅम : न्यूझीलंडने विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अपराजित मालिका कायम राखली आहे. दक्षिण आफ्रिकेवर चार विकेट राखून सफाईदार विजय मिळवीत त्यांनी गुणतक्त्यात आघाडी घेतली आहे. पावसाचा दीड तास व्यत्यय आलेल्या सामन्यात प्रत्येकी एक षटक कमी करण्यात आले. त्यात आफ्रिकेला २४२ धावांचेच आव्हान देता आले. किवींनी ते तीन चेंडू राखून पार केले.

अँडील फेहलुक्वायो याने टाकलेल्या अखेरच्या षटकात किवींना आठ धावा हव्या होत्या. त्या वेळी विल्यमसन ९६ धावांवर नाबाद होता. त्याला साथ दिलेला ग्रँडहोम ६० धावांवर बाद झाल्यामुळे काहीसे दडपण होते. सँटनरने पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेत विल्यमसनला स्ट्राइक दिली. त्यानंतर विल्यमसनने मिडविकेटला जोरदार षटकार खेचला. याबरोबरच त्याने विजय आवाक्यात आणला. मग पुढील चेंडूवर चौकार मारत त्याने धडाक्यात शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २४१ अशी मजल मारली. सामना सुरू होण्याअगोदर झालेल्या पावसामुळे ही लढत प्रत्येकी ४९ षटकांची करण्यात आली. सकाळी पडलेला पाऊस तसेच ढगाळ वातावरण, अशा प्रतिकूल परिस्थितीत प्रथम फलंदाजी करण्याची वेळ आलेल्या आणि मुळातच फलंदाजीत सूर हरपलेल्या दक्षिण आफ्रिकेने पूर्ण षटके खेळण्याचे ध्येय राखले. यादरम्यान त्यांनी धावांच्या गतीचा विचार केला नाही. सुरवातीला हशिम आमला आणि त्यानंतर रासी वॅन डर डुसेन्‌ यांनी झळकाविलेली अर्धशतके दक्षिण आफ्रिकेला सव्वादोशच्या पुढे नेणारी ठरली. 

दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला शंभरच्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करता आली नाही. अपवाद डुसेन्‌चा; पण त्यानेही अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीमुळे त्याला ६४ चेंडूंत नाबाद ६७ धावा करता आल्या. दुसऱ्याच षटकात फॉर्मात असलेला एकमेव फलंदाज डिकॉकची यष्टी बोल्टने उडविल्यावर आफ्रिकेच्या फलंदाजांनी अधिकच सावध पवित्रा घेतला. एक बाजू सांभाळण्याची जबाबदारी हशिम आमलाने स्वीकारली. त्याने कर्णधार डुप्लेसीसह दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर मार्करमसह अर्धशतकी भागीदारी करून आमला ५५ धावांवर बाद झाला. या खेळीत त्याला अवघे चारच चौकार मारता आले.

चार बाद १३६ या अवस्थेनंतर डुसेन्‌ आणि डेव्हिड मिलर यांनी ७४ चेंडूंत ७२ धावांची भागीदारी केली. पण, त्यातील ६७ चेंडूंपर्यंत त्यांना एकही चौकार किंवा षटकार मारता आला नव्हता. ही कोंडी डुसेन्‌ने षटकार मारून फोडली. लगेचच मिलरने दोन चौकार मारले. पण, त्यानंतर तोही बाद झाला. त्यानंतर डुसेन्‌ने धावांचा वेग वाढविण्याची जबाबदारी स्वीकारली.

आमलाच्या ८ हजार धावा
दक्षिण आफ्रिकेचा सलामीचा फलंदाज हाशिम आमलाने अर्धशतकी खेळी केली. या खेळीत २५वी धाव घेताना त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये झटपट ८ हजार धावा करण्याची कामगिरी केली. त्याने ही कामगिरी करताना डिव्हिलर्स, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा यांना मागे टाकले. आमलाने १७६ डावांत ही कामगिरी केली. झटपट ८ हजार धावा करणारा आमला दुसरा फलंदाज ठरला आहे. विराट कोहली यात आघाडीवर असून, त्याने १७५ डावांत अशी कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा आमला दक्षिण आफ्रिकेचा चौथा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिस, एबी डिव्हिलर्स, हर्शेल गिब्ज यांनी अशी कामगिरी केली आहे.

संक्षिप्त धावफलक : 
दक्षिण आफ्रिका : ४९ षटकांत ६ बाद २४१ (हशिम आमला ५५ -८३ चेंडू, ४ चौकार; फाफ डुप्लेसी २३ -३५ चेंडू, ४ चौकार; मार्करम ३८ -५५ चेंडू, ४ चौकार; रासी वॅन डर डुसेन्‌ नाबाद ६७ - ६४ चेंडू, २ चौकार, ३ षटकार; डेव्हिड मिलर ३६ -३७ चेंडू, २ चौकार, १ षटकार; ट्रेंट बोल्ड १०-०-६३-१, फर्ग्युसन १०-०-५९-३) पराभूत विरुद्ध : न्यूझीलंड : ४८.३ षटकांत ६ बाद २४५ (मार्टिन गप्टील ३५, कॉलिन मुन्रो ९, केन विल्यमसन नाबाद १०६-१३८ चेंडू, ९ चौकार, १ षटकार, कॉलिन डि ग्रँडहोम ६०-४७ चेंडू, ५ चौकार, २ षटकार , कागिसो रबाडा १-४२, ख्रिस मॉरिस ३-४९, फेहलुक्वायो ८.३-०-७३-१)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com