लक्ष्यने ऑलिंपिक विजेत्यास झुंजविले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

ऑकलंड (न्यूझीलंड) - जागतिक ज्युनियर क्रमवारीत अव्वल स्थानापर्यंत भरारी घेतलेल्या भारताच्या १६ वर्षीय लक्ष्य सेन याने न्यूझीलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत दोन वेळच्या ऑलिंपिक विजेत्या लीन डॅन याच्याविरुद्ध एक गेम जिंकण्याचा पराक्रम केला. 

एक तास सात मिनिटे चाललेला सामना डॅनने पहिल्या गेमच्या पिछाडीनंतर १५-२१, २१-१५, २१-१२ असा जिंकला, पण लक्ष्यने मने जिंकली. लक्ष्यसाठी गमावण्यासारखे काहीच नव्हते. पहिल्या गेममध्ये डॅनने बेफिकिरीने खेळ केला. कदाचित त्याने लक्ष्यचे आव्हान गांभीर्याने घेतले नसावे. लक्ष्यने याचा फायदा उठविला. पुढील दोन गेममध्ये मात्र ३४ वर्षीय डॅनने भक्कम खेळ केला. काही लाइनकॉल विरोधात जाऊनही त्याने निकालावर परिणाम होऊ दिला नाही.
पहिल्या गेममध्ये डॅनला नेटजवळील रॅलींमध्ये अचूक फटके मारता आले नाहीत. त्यामुळे लक्ष्यला सहजी गुण मिळाले. अखेरच्या पाचही गुणांना लक्ष्यकडून चुका झाल्या. 

डॅनची आता समीर वर्माशी लढत होईल. समीरने हाँगकाँगच्या चेयूक यिऊ ली याला २१-१७, २१-१९ असे सहज हरविले. बी. साईप्रणितने मलेशियाच्या डॅरेन लिव याचे आव्हान २१-१८, २१-१७ असे परतावून लावले.

अजय जयरामचे आव्हान मात्र संपुष्टात आले. कोरियाच्या हिओ क्वांगविरुद्ध तो १५-२१, २२-२०, ६-२१ असा हरला. दुसऱ्या गेममधील शर्थीच्या झुंजीनंतर तो तिसऱ्या गेममध्ये ढेपाळला.

Web Title: newzeland open badminton competiion