नेमारने साकारला पीएसजीचा विजय

वृत्तसंस्था
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

नेमारने अखेरच्या मिनिटात केलेल्या गोलमुळे पीएसजीने लीग वन अर्थात फ्रेंच फुटबॉल साखळीत लिऑनचा 1-0 असा पाडाव केला आणि त्यामुळे पीएसजीला लीगमधील अव्वल स्थान राखता आले.

पॅरिस : नेमारने अखेरच्या मिनिटात केलेल्या गोलमुळे पीएसजीने लीग वन अर्थात फ्रेंच फुटबॉल साखळीत लिऑनचा 1-0 असा पाडाव केला आणि त्यामुळे पीएसजीला लीगमधील अव्वल स्थान राखता आले.

लिऑनचा गोलरक्षक नेमारचे प्रयत्न अपयशी ठरवत होता; पण अखेर तीन मिनिटे असताना नेमारने गोलरक्षकास चकवले. नेमारने सलग दुसऱ्या लढतीत निर्णायक गोल केला. तो पीएसजी सोडून बार्सिलोनाकडे जाणार असल्याची चर्चा जोरात सुरू होती, त्यामुळे त्याला दुखापतीचे कारण दाखवून संघाबाहेर ठेवल्याची चर्चाही रंगली होती.

नेमार नक्कीच यापेक्षा चांगला खेळ करू शकतो. त्याचा हा चार महिन्यातील तिसराच सामना आहे. तो अजूनही पूर्ण तंदुरुस्त नाही. तो पूर्ण तंदुरुस्त झाल्यावर संघाच्या कामगिरीत नक्कीच मोलाचा वाटा उचलेल, असे पीएसजीचे मार्गदर्शक थॉमस तुशेल यांनी सांगितले. नेमारने किलिन एम्बापे, एडिनसन कॅव्हिनी आणि मौरा इकार्द यांच्या अनुपस्थितीतही संघाला विजयी केले.

बेनझेमाचा निर्णायक गोल
माद्रीद ः रेयाल माद्रिदने मार्गदर्शक झिनेदीन झिदान यांच्यावरील दडपण कमी करताना ला लिगामध्ये सेविलाचा 1-0 असा पाडाव केला. करीम बेनझेमाच्या गोलने रेयालला विजयी केले. या विजयामुळे रेयालने संयुक्त आघाडी घेतली. त्यांनी बार्सिलोनास चार गुणांनी मागे टाकले आहे.

लिव्हरपूलची चेल्सीवर मात
लंडन ः लिव्हरपूलने प्रीमियर लीगमधील आघाडी वाढवताना चेल्सीचा 2-1 असा पराभव केला. लिव्हरपूलचा हा सलग सहावा विजय. ही कामगिरी करणारा तो पहिलाच संघ ठरला आहे. त्यांनी लीगमधील सलग 15 लढती जिंकल्या आहेत; तर गेल्या 45 पैकी एकच सामना गमावला आहे. दरम्यान, आर्सेनलने दोनदा पिछाडी भरून काढत ऍस्टॉन व्हिलास 3-2 असे हरवले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: neymar shines in psg win